सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय  स्थिती?

योगेश खरे | Updated: Nov 2, 2018, 10:54 PM IST
सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का? title=

अहमदाबाद : गुजरातमधील नर्मदेच्या पात्रात जगातील सर्वाधिक उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय आहे तिथली वस्तुस्थिती?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा हा अतिभव्य पुतळा. स्टॅच्यू ऑफ युनिटी. एकात्मता आणि अखंडतेचा अवघ्या जगाला संदेश देण्यासाठी मोदी सरकारने नर्मदा धरण परिसरात हा अतिभव्य पुतळा उभारला. या पुतळ्यामुळे भारताची मान तर उंचावली आहेच, पण स्थानिक आदिवासी बांधवांचाही विकास होईल, असा दावा सरकारनं केलाय. या दाव्याची पडताळणी करण्यासाठी 'झी मीडिया'ची टीम पोहोचली तिथल्या केवडिया आणि बागडिया या दोन गावांमध्ये.

नर्मदा धरण बांधताना शेकडो आदिवासींच्या जमिनी  सरकारनं संपादित केल्या. त्याचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन झालं. पण वर्षं उलटली तरी अनेकांना अजून जमिनीचा योग्य मोबदला देखील मिळालेला नाही. अनेक आदिवासी संपादित जमिनीवरच कसेबसे राहतायत. नर्मदा नदीच्या तोंडावर वसलेल्या या गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. हातपंप बंद पडलेत. गावातले अनेक प्रश्न अजून सुटलेले नाहीत.

नर्मदा परिसरात काम करणाऱ्या लोकांसाठी इथं केवडिया कॉलनी उभी करण्यात आली. तिथंही पाणी नाही... पेट्रोल डिझेलसारखं इंधनही बाटल्यांमधून विकलं जातं. सरकारी वसाहतीतला हा अनधिकृत पंप पाहून धक्काच बसतो. गावाबाहेर लाखो रूपये खर्च करून तातडीनं हेलिपॅड बनवण्यात आलंय. ज्या गावाला कधी रस्ते मिळाले नाहीत, तिथं आज पक्के डांबरी रस्ते तयार करण्यात आलेत. पुतळ्यामुळं एवढाच काय तो विकास झालेला इथं दिसला. पुतळ्यामुळं रोजगार मिळालेले काही युवकही आम्हाला भेटले.

त्यानंतर आम्ही पोहोचलो बागडिया गावात. पंधराशे उंबरठ्यांचं हे गाव. पडलेली घरं आणि त्यात राहणारी वयोवृद्ध माणसं. इथल्या समस्यांबाबत विचारणा केल्यावर, गावातल्या लोकांनी बोलण्यास नकार दिला. त्यांच्या चेहऱ्यावर दहशत दिसत होती. या गावचे सरपंच मात्र सुटाबुटात दिसले. लवकरच आपण गाईड होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या सरपंचांसारख्या काही निवडक मंडळींचा अपवाद वगळता, तर इतर सर्वांनीच नाराजीची भावना बोलून दाखवली. त्यामुळं विकासाचे कितीही दावे करण्यात येत असली तरी पुतळ्याखाली अंधार दिसून येत आहे.

या पुतळ्याकडे जाण्यासाठी तातडीने चौपदरी रस्ता बनविण्यात आले. यात रस्त्यावर  असलेले बागडीया पूर्णपणे अर्धवट कापले गेले. आजही रस्त्याच्या कडेला असलेली ही घरे त्याची साक्ष आहेत.