हरियाणात मनोहर लाल खट्टर यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण

मनोहर लाल खट्टर यांना सरकार स्थापण्यासाठी राज्यपालांनी आमंत्रित केले आहे.  

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 26, 2019, 05:25 PM IST
हरियाणात मनोहर लाल खट्टर यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रण title=
Pic Courtesy: ANI

चंदीगढ : हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी मनोहर लाल खट्टर  (Manohar Lal Khattar) यांना सरकार स्थापण्यासाठी आमंत्रित केले आहे. तत्पूर्वी, खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यांनी ५७ आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापण्याचा दावा केला होता. दरम्यान, यापूर्वी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मनोहर लाल खट्टर यांना पक्षाचे नेते म्हणून निवडले गेले होते. शनिवारी झालेल्या या बैठकीत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे निरीक्षक म्हणून बैठकीस उपस्थित होते.

मनोहर लाल खट्टर म्हणाले, रविवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेतील. मंत्री शपथ घेतील की नाही याबाबत उद्या निर्णय होईल, असेही खट्टर म्हणाले. हरियाणाचे उपमुख्यमंत्री जेजेपी (जेजेपी)  (JJP) नेते दुष्यंत चौटाला (Dushyant Chautala) असतील. रविवारी दुपारी अडीच वाजता राजभवनात शपथविधी होणार असल्याचे खट्टर यांनी सांगितले.

हरियाणामध्ये भाजपाने सत्ता स्थापन करण्यासाठी जेजेपीसोबत (जननायक जनता पार्टी) सत्तास्थापनेसाठी दावा केला होता. जेजेपीकडे फक्त दहा जागा असतानाही खिंडित अडकलेल्या भाजपने त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिले आहे. महाराष्ट्रातही भाजपची वेगळी स्थिती नाही. त्यामुळे महाराष्ट्रात भाजप सत्तास्थापन करण्यासाठी शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्री पद देणार का, अशी चर्चा सुरू आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सत्ता स्थापनेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. ९० सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ४६ सदस्यांची गरज आहे. भाजपाला जेमतेम ४० जागा मिळाल्यात. गेल्यावेळेपेक्षा सात जागा कमी झाल्या आहेत. त्यामुळे भाजपला सहा आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाचे १० आमदार निवडून आले आहे. त्यांच्या मदतीने हे सरकार स्थापन होत आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x