Man Strangles 7 Yr Old Son: सात वर्षांच्या मुलाची झोपेतच गळा दाबून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुसऱ्या बायकोच्या दबावाखाली येत पित्यानेच आपल्या पोटच्या मुलाला संपवल्याची हृदद्रावक घटना घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला अटक केली आहे.
इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या प्रतिकचा त्याच्या वडिलांनी गळा आवळून खून केला आहे. प्रतिक दररोज रात्री त्याच्या आजी-आजोबांसोबत झोपत असे. रविवारी त्याचे वडिल शशिपाल मुंड त्याला त्याच्यासोबत खोलीत झोपण्यास घेऊन गेले. खोलीत कुलर लावला आहे त्यामुळं थंडावा आहे, असं आमिष त्याला दाखवले. कुलरच्या थंड हवेत झोपणार म्हणून उत्साहात असलेला प्रतिक मोठ्या खुशीत त्याच्या वडिलांकडे झोपायला गेला. प्रतिकच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून त्याचे आजी-आजोबाही खुष होते.
प्रतिक झोपल्याची खात्री करुन शशिपालने टिव्हीचा आवाज वाढवला. त्यानंतर झोपलेल्या प्रतिकचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने त्याचे पत्नीला व्हिडिओ कॉल केला. मात्र तिने फोन उचलला नाही. मुलाच्या हत्येचा पुरावा म्हणून शशिपालने त्याची तिसरी पत्नी पायलला व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ पाठवला. मात्र, तिला व्हिडिओ मिळाला नाही कारण तिने शशिपालला ब्लॉक केले होते. व्हिडिओसोबत आरोपीने पायलला एक मेसेजही पाठवला होता. यात त्याने आता माझा मुलगा तुला कधीच त्रास देणार नाही, कारण मी त्याला ठार केले आहे, असं लिहिलं होतं.
प्रतिकचा खून केल्यानंतर शशिपालने घरातून पोबारा केला. मात्र मंगळवारी पोलिसांनी शशिपाल आणि पायलला अटक केली आहे. दरम्यान, पायलने अलीकडेच एका मुलाला जन्म दिला होता आणि ती शशिपालला सोडून तिच्या आई-वडिलांकडे राहत होती. तसंच, जोपर्यंत प्रतिकपासून सुटका मिळत नाही तोपर्यंत मी परत येणार नाही, अशी धमकी तिने त्याला दिली होती. त्या दबावातूनच शशिपालने पोटच्या मुलाची हत्या केली. प्रतिकच्या हत्येचा व्हिडिओ शशिपालच्या फोनमध्ये सापडला आहे.
शशिपाल मुंडे याच्या तिसऱ्या पत्नीला सुरुवातीपासूनच प्रतीख खटकत होता. ती नेहमी त्याच्यामुळं वाद घालत होती. माहेरी जातानाही तिने शशिपालला प्रतिकला कुठेतरी पाठव किंवा मारुन टाक अशा शब्दांत धमकी दिली होती. दरम्यान, या सगळ्या घटनाक्रमात पायलने मात्र निर्दोष असल्याचं म्हटलं आहे. मी माझ्या नवऱ्याला त्याच्या सात वर्षांच्या मुलाला ठार मारण्यास कधीच सांगितले नव्हते, असं सावध भूमिका तिने घेतली आहे. तरीही पोलिसांनी पाययला ताब्यात घेतलं आहे. तसंच, घटनेचा पुढील तपास पोलिस करत असून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. तर, नातवाच्या मृत्यूमुळं त्याचे आजी-आजोबांना मोठा धक्का बसला आहे.