एकाच व्यक्तीला तीन सरकारी नोकऱ्या; ३० वर्षे मिळायचे तीन पगार

सरकारकडून पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीएफएमएस या नव्या यंत्रणेमुळे सुरेश राम याची पोलखोल झाली.

Updated: Aug 26, 2019, 07:58 AM IST
एकाच व्यक्तीला तीन सरकारी नोकऱ्या; ३० वर्षे मिळायचे तीन पगार title=

पाटणा: सरकारी नोकरी मिळवणे हे आपल्यापैकी अनेकांचे स्वप्न असते. चांगला पगार आणि नोकरीची हमी यामुळे अनेकजण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी आकाशपाताळ एक करतात. तरीही मोजक्याच भाग्यवंतांच्या पदरात हे दान पडते. मात्र, बिहारमध्ये गेल्या ३० वर्षांपासून एकच व्यक्ती तीन वेगवेगळ्या पदांवर काम करत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे जिथे लोकांची एक सरकारी नोकरी मिळवताना मारामार असते तिथे या व्यक्तीने तीन सरकारी नोकऱ्या मिळवल्याच कशा, याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 
 
 सुरेश राम असे या कर्मचाऱ्याचे नाव असून तो गेल्या ३० वर्षांपासून तीन वेगवेगळ्या सरकारी पदांवर काम करतोय. या तिन्ही नोकऱ्यांचा वेगवेगळा पगारही त्याला मिळत आहे. 'डीएनए' या इंग्रजी दैनिकाच्या माहितीनुसार, सुरेश कुमार एकाचवेळी किशनगंज येथील बांधकाम विभागाचे कार्यालय आणि जलसंधारण विभागाच्या बांका व भीमनगर पूर्व येथील कार्यालयांमध्ये सहायक अभियंता पदावर नोकरी करत होता. 
 
सरकारकडून पगाराचा हिशोब ठेवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सीएफएमएस या नव्या यंत्रणेमुळे सुरेश राम याची पोलखोल झाली. यानंतर त्याच्यावर तिन्ही ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या सुरेश राम फरार असल्याचे समजते. 

सुरेश राम १९८८ साली पाटणा येथील बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कामाला लागला होता. याचदरम्यान त्याला जलसंधारण विभागातील नोकरीचा प्रस्ताव चालून आला. या नोकरीसाठी पुन्हा सरकारकडून पत्र आल्यानंतर सुरेश राम याने हा प्रस्ताव नाकारला नाही. विशेष म्हणजे तिन्ही ठिकाणी नोकरी करताना त्याला बढती मिळाली होती. मात्र, सीएफएमएस प्रणालीमुळे त्याचा खोटारडेपणा उघड झाला.