एकाच वेळी ५०० ठिकाणांवर पोहोचणार 'चौकीदार'

नरेंद्र मोदी यांनी १६ मार्चपासून 'मैं भी चौकीदार' या मोहीमेची सुरुवात केली होती. 

Updated: Mar 31, 2019, 11:07 AM IST
एकाच वेळी ५०० ठिकाणांवर पोहोचणार 'चौकीदार' title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'मैं भी चौकीदार' या मोहिमेअंतर्गत रविवारी पंतप्रधान मोदी एक कोटी जनतेशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता तालकटोरा मैदानात हा कार्यक्रम होणार आहे. देशातल्या ५०० ठिकाणांहून व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पंतप्रधान जनतेशी  संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील लोकांशी पंतप्रधान संवाद साधतील. यावेळी अमित शाह, राजनाथ सिंह, सुषमा स्वराज दिल्लीत विविध ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तर योगी आदित्यनाथ आग्रा येथे हजर असतील. 

याबद्दल ट्विटरवरून माहिती देताना नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, 'मैं भी चौकीदार' या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशाच्या विविध भागातील लाखो चौकीदार एकत्र जमणार आहेत. हा ऐतिहासिक असा क्षण असेल. नरेंद्र मोदी यांनी १६ मार्चपासून 'मैं भी चौकीदार' या मोहीमेची सुरुवात केली होती. या मोहिमेतंर्गत नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरील नावाच्या आधी चौकीदार हे संबोधन लावले होते. या मोहीमेची देशभरात चांगलीच चर्चा झाली होती. 

गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून आक्रमक प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, या प्रचाराला हवी तशी धार येत नव्हती. काँग्रेसची 'चौकीदार चोर है' ही घोषणा भाजपसाठी डोकेदुखी ठरत होती. तेव्हा मोदींनी 'मै भी चौकीदार हूं' असा नारा देत काँग्रेसला शह दिल्याचे मानले जाते. सोशल मीडियावर या मोहिमेला चांगलेच यश मिळाले.