मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीतल्या वरिष्ठांशी 4 तास चर्चा, मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला?

राज्यातील मंत्रीमंडळ विस्तार 2 ते 3 दिवसात होणार, मंत्रीमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती

Updated: Jul 31, 2022, 11:27 AM IST
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीतल्या वरिष्ठांशी 4 तास चर्चा, मंत्रीमंडळाचा फॉर्म्युला ठरला? title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Ekanth Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची काल दिल्लीत भाजपचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा (J P Nadda) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्या सोबत सुमारे 4 तास बैठक झाली. मुख्यमंत्री शनिवारी रात्री साडेनऊला दिल्लीत दाखल झाले. तर उपमुख्यमंत्री त्याअगोदरच संध्याकाळी साडेसहा वाजता दिल्लीत दाखल झाले होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रात्री ३ वाजता खाजगी चार्टरने मुंबईकडे रवाना झाले.

दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत मंत्रीमंडळ विस्तारावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती मिळतेय. एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्या फॅार्म्युला कोणता असावा यावरून चर्चा झाली. एकनाथ शिंदे 50-50 टक्के मंत्रीपदावर ठाम होते. परंतु भाजप 60-40 फॅार्म्युलाचा आग्रह करत होती. यावर तोडगा निघाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

शिवाय महत्त्वाची खाते कोणाकडे असावी यावरूनही चर्चा झाली. आणि सुप्रीम कोर्टात सरकारची बाजू कशी असेल यावरही विधीज्ञांशी चर्चा करण्यात आलीय. या बैठकीनंतर 2-3 दिवसात मंत्रीमंडळ होणार असल्याचा दावा भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलाय.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी पाच वाजता संभाजी नगरमधल्या नियोजित कार्यक्रमासाठी दाखल झाले.