राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार? सोमवारी राजधानीत महत्त्वाच्या बैठका

विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे.

Updated: Nov 3, 2019, 08:54 PM IST
राज्यातला तिढा दिल्लीत सुटणार? सोमवारी राजधानीत महत्त्वाच्या बैठका title=

नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १० दिवस उलटले तरी राज्यात सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. सत्तेत समसमान वाटा आणि अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद या फॉर्म्युलावर शिवसेना ठाम आहे. सत्तेचा हा तिढा दिल्लीमध्ये सुटण्याची शक्यता आहे. कारण सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वाच्या बैठका होणार आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोमवारी दिल्लीला जाणार आहेत. दिल्लीला जाऊन मुख्यमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या माध्यमातून अधिकाधिक आणि तातडीची मदत मिळावी, यासाठी फडणवीस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. या भेटीत राज्यातल्या सत्ता स्थापनेच्या मुद्द्यावरही चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे सोमवारी भाजपची महत्त्वाची बैठक होत असतानाच दिल्लीतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींची भेट घेणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची पुढची भूमिका ठरवण्याबाबत ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.