मध्यप्रदेश: तळीरामांना अद्दल, गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड

मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ग्रामस्थांनी दारुड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 20, 2017, 07:10 PM IST
मध्यप्रदेश: तळीरामांना अद्दल, गळ्यात चपलांचा हार घालून काढली धिंड title=

भोपाळ : मध्यप्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात ग्रामस्थांनी दारुड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे.

गावात दारु पिणाऱ्या तीन युवकांच्या गळ्यात ग्रामस्थांनी चपलांचा हार घातला आणि मग संपूर्ण गावात फिरवलं. शिवपुरी जिल्ह्यातील खाडा गावात ही घटना घडली आहे.

मध्यप्रदेशातील अनेक जिल्ह्यातील ग्रामस्थ दारुबंदीची मागणी करत आहेत. मात्र, सरकारने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाहीये. खाडा गावातील ग्रामस्थांचीही दारूबंदीची मागणी आहे. मात्र, या गावातील युवक दारुच्या आहारी गेले आहेत.

अशाच प्रकारे दारु पिणाऱ्या तिघांना ग्रामस्थांनी चांगलाच धडा शिकवला आहे. या तीन युवकांच्या गळ्यात चपलांचा हार घातला आणि त्यानंतर बँड-बाजा वाजवत गावातून त्यांची धिंड काढली. या संपूर्ण प्रकाराची सर्वत्र खूपच चर्चा होत आहे. काहीजण या प्रकाराला मानवाधिकाराविरोधात असल्याचं म्हणत आहेत.

याच वर्षी एप्रिल महिन्यात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घोषणा केली होती की, टप्प्या टप्प्याने संपूर्ण प्रदेशात दारूबंदी लागू केली जाईल. पहिल्या टप्प्यात नर्मदा नदीपासून पाच किलोमीटर परिसरात दारूबंदी करण्यात आली आहे.