मुंबई : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा भडका झाला आहे. एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आता २६५ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी महागाईचा बॉम्ब फुटला आहे. एक नोव्हेंबर रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजीच्या दरात वाढ झाल्याची घोषणा केली आहे. ही वाढ केवळ व्यावसायिक सिलेंडरमध्येच झाली आहे, ही दिलासादायक बाब आहे. घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.
या नव्या दरांमुळे व्यावसायिक वापराचा सिलेंडरमध्ये मोठा फरक पडला आहे. १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १७३६.५ रुपयांवरुन २०००.५ रुपये इतकी झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती वापरासाठीच्या १४.२ किलो विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ केलेली नाही. त्यामुळे त्यांची दरवाढ झालेली नाही. दिल्लीत १४.२ किलोच्या विनाअनुदानित एलपीजी सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपयांवर कायम आहे. गेल्या महिन्यात पेट्रोलियम कंपन्यांनी विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत १५ रुपयांनी वाढवली होती.
LPG prices for commercial cylinders increased by Rs 266 from today onwards. Commercial cylinders of the 19 kg in Delhi will cost Rs 2000.50 from today onwards which was costing Rs 1734 earlier. No increase in domestic LPG cylinders.
— ANI (@ANI) November 1, 2021
दिल्लीत व्यावसायिक सिलेंडर २००० रुपयांच्या पुढे गेला आहे. पूर्वी तो १७३३ रुपये होता. मुंबईत १७८३ रुपयांना मिळणारा १९ किलोचा सिलेंडर आता १९५० रुपयांना मिळणार आहे. त्याच वेळी, आता कोलकातामध्ये १९ किलोचा इंडेन गॅस सिलेंडर २०७३.५० रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आता १९ किलोच्या सिलेंडरची किंमत २१३३ रुपये आहे.
एक ऑक्टोबर रोजी केवळ १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली होती. कोलकात्यात ९२६ आणि चेन्नईमध्ये १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर ९१५.५० रुपयांना उपलब्ध आहे. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती पाहता यावेळी एलपीजी सिलेंडरची किंमत १००० रुपयांच्या पुढे जाण्याची भीती व्यक्त केली जात होती.
दिल्लीत आता विनाअनुदानित १४.२ किलोच्या सिलेंडरची किंमत ८९९.५० रुपये आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलेंडरची किंमत ९२६ रुपये, मुंबईत ८९९.५० रुपये आहे. चेन्नईमध्ये विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ९१५.५० रुपये आहे.