संगरूर : ‘डॉली कि डोली’ या सिनेमातील कथेप्रमाणे लग्न जुळवून लोकांची लूट करणा-या एका नवरीचा भांडाफोड झालाय. या नवरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे ही चोरटी नवरी तरूण नाही तर चक्क ५० वर्षांची आहे. या नवरीसह दोघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेली ही नवरी तब्बल ५० वर्षांची असून तिच्याकडून ७ लाख रूपयांची रक्कम ताब्यात घेण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर नवरी आपल्या पाच साथीदारांना नातेवाईक म्हणून ओळख करून द्यायची. तसेच ती विधवा असल्याचे आणि शहरात मोठी जमिन असल्याच्या माहितीसोबत वॄत्तपत्रात लग्नासाठी जाहीरात देत होती. नंतर एखाद्या जास्त वयाच्या व्यक्तीसोबत लग्न करुन किंवा लग्नाचं आमिष दाखवून ती त्याला लुटायची. त्यानंतर पुन्हा दुस-या शिकारीच्या शोधात निघत होती.
पोलिसांनी दावा केलाय की या गॅंगने आत्तापर्यंत साधारण १० लोकांना आपल्या जाळ्यात घेऊन त्यांच्याकडून करोडो रूपयांची लूट करण्यात आली आहे. या महिलेची दोन लग्न झाली होती तरीही ती तिस-या व्यक्तीसोबत लग्न करण्याच्या तयारीत होती.
संगरूर जिल्ह्यातील घराचो या गावातील ५० वर्षीय महिला परमजीत कौरने आपल्या गॅंगसोबत मिळून करोडोंची लूट केली आहे. परमजीतच्या या फसवणुकीचा भांडाफोड लोहाखेडा या गावात पुष्पिंदर दासची फसवणूक झाल्यावर झाला. परमजीतने पुष्पिंदरसोबत साखरपुडा केल्यावर २ लाखाने त्याला फसवले होते. याची शंका आल्याने त्याने पोलिसांकडे धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेला आणि तिच्या साथीदारांना अटक केली. सोबतच तिच्याकडून ७ लाखांची रोकड आणु ७ तोळे सोनं ताब्यात घेतलं.