LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार

LokSabha Election 2024: भोजपुरी अभिनेता पवन सिंगने आसनसोलमधून निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने आपल्या पहिल्या उमेदवारांच्या यादीत त्याच्या नावाची घोषणा केली होती. आसनसोलमधून सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत.   

शिवराज यादव | Updated: Mar 3, 2024, 03:36 PM IST
LokSabha: उमदेवार जाहीर केल्यानंतर भाजपाला पहिला धक्का! प्रसिद्ध अभिनेत्याने निवडणूक लढण्यास दिला नकार title=

LokSabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीत 400 पेक्षा जास्त जिंकण्याचा निर्धार करणाऱ्या भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केलेला भोजपुरी अभिनेता पवन सिंगने निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. भाजपाने शनिवारी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत पवन सिंगचं नाव होतं. भाजपाने त्याला पश्चिम बंगालच्या आसनसोलमधून उमेदवारी दिली होती. या मतदारसंघात सध्या तृणमूल काँग्रेसचे शत्रुघ्न सिन्हा खासदार आहेत. 

पवन सिंगने एक्सवर पोस्ट शेअर करत आपण निवडणूक लढू शकत नसल्याचं सांगितलं आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, "भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवत आसनसोल येथून उमेदवार म्हणून घोषणा केली होती. पण मी काही कारणास्तव आसनसोल येथून निवडणूक लढू शकणार नाही".

पवन सिंगच्या या निर्णयावर तृणमूल काँग्रेस पक्षाचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांनी टोला लगावला आहे. ही आहे पश्चिम बंगालच्या लोकांची भावना आणि ताकद असं ते उपहासात्मकपणे म्हणाले आहेत.

शनिवारी केली होती आभार मानणारी पोस्ट

याआधी जेव्हा भाजपाने आसनसोल येथून उमेदवारीची घोषणा केली होती, तेव्हा पवन सिंगने लगेच पोस्ट करत नेतृत्वाचे आभार मानले होते. त्याने लिहिलं होतं की, "मला आसनसोलमधून उमेदवारी दिल्याबद्दल मी भाजपाच्या राष्ट्रीय नेतृत्वातील सर्वांचे आभार मानतो". तसंच त्याने प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटलं होतं की, "माझा जन्म बंगालमध्ये झाला आहे. तेथील पाणी आणि मीठ माझ्या रक्तात आहे. तिथे मला लोकांचं प्रेम मिळेल आणि जिंकेन".

शत्रुघ्न सिन्हा यांना आव्हान देण्यासाठी भाजपाने दिली होती उमेदवारी

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा आसनसोलमधून खासदार आहेत. त्यांना आव्हान देण्याच्या हेतूनेच भाजपाने भोजपुरी स्टार पवन सिंगला मैदानात उतरवलं होतं. पवन सिंगचा मोठा चाहतावर्ग आहे. चित्रपटांसह तो गायकही असून त्याची करोडोंची संपत्ती आहे. रिपोर्टनुसार, पवन सिंगची एकूण संपत्ती जवळपास 6 ते 8 मिलियन डॉलर आहे. भोजपुरीमधील महागड्या अभिनेत्यांमध्ये त्याला गणलं जातं.