लोकसभा निवडणूक २०१९ : तिसऱ्या टप्प्यात देशभरातील ११७ जागांसाठी मतदानाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे मतदारांना मतदानाचं आवाहन केलंय

Updated: Apr 23, 2019, 08:01 AM IST
लोकसभा निवडणूक २०१९ : तिसऱ्या टप्प्यात देशभरातील ११७ जागांसाठी मतदानाला सुरुवात title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ साठी देशाभरातल्या ११७ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्याचं वैशिष्ट्य म्हणजे या टप्प्यात भाजपा आणि काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ज्या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत त्या मतदारसंघात मतदान होतंय. भाजपाध्यक्ष अमित शाह गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून तर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी केरळच्या वायनाडमधून निवडणूक लढवत आहेत. या मतदार संघात आज मतदान होणार आहे. तर समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायमसिंह यादव यांच्या उत्तर प्रदेशातील मैनपुरीत आणि काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या गुलबर्गा मतदारसंघात मतदान होतंय. त्यामुळे दिग्गज नेत्यांचं भवितव्य मतपेटीत कैद होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदीही आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ते अहमदाबादमध्ये मतदान करतील. पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळीच अहमदाबादच्या रानिपमध्ये दाखल झाले आहेत. मतदानापूर्वी आईचा आशिर्वाद घेण्यासाठी ते गांधीनगरस्थित आपल्या घरी दाखल झाले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे मतदारांना मतदानाचं आवाहन केलंय.

राज्यातल्या १४ लोकसभा मतदारसंघात आज मतदान होत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आणि मराठवाड्यातले हे चौदा मतदारसंघ आहेत. पश्चिम महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्यात मतदारसंघात मतदान होतंय. पश्चिम महाराष्ट्रातल्या पुणे, बारामती, सातारा, सांगली, कोल्हापूर, हातकणंगले, नगर आणि माढा तर कोकणातल्या रायगड आणि रत्नागिरी -सिंधुदुर्ग, मराठवाड्यातल्या जालना आणि औरंगाबाद आणि खान्देशातल्या रावेर आणि जळगाव या मतदारसंघात मतदान होतंय.