ट्विटरवर भाजपा नेत्यांचे नामकरण

भाजपाने निवडणुकीच्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरू करण्यात आले आहे.

Updated: Mar 17, 2019, 04:44 PM IST
ट्विटरवर भाजपा नेत्यांचे नामकरण title=

नवी दिल्ली : राहुल गांधींच्या चौकीदार चोर है या मोहिमेला उत्तर देण्यासाठी आता भाजपाच्या जवळपास सर्व नेत्यांनी आपल्या ट्विटरचे नावच बदलून टाकले आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, रेल्वे मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आपल्या ट्विटर हॅंडलचे नाव आता बदलले आहे. प्रत्येकाने आपल्या नावामागे चौकीदार नाव लावले आहे. नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट @narendramodi असे होते. आता या नावापुढे चौकीदार शब्द लावण्यात आला आहे. आता पंतप्रधान मोदींच्या ट्विटर अकाउंटचे नाव 'चौकीदार नरेंद्र मोदी' असे करण्यात आले आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी 'मैं भी चौकीदार' हे अभियान सुरू करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या ट्विटरवरून एक व्हिडिओ जाहीर करून निवडणुकीच्या प्रचार मोहिमेला सुरूवात केली आहे. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात नरेंद्र मोदींना अनेकदा चौकीदार चोर है असे म्हटले आहे. विरोधकांच्या याच आरोपाला भाजपाने आपल्या प्रचारासाठी वापरले आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मणिशंकर अय्यर यांच्या चायवाला या टिपणीलाही भाजपाने निवडणूक अभियानाचा भागच बनवला आहे. 

पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ शेअर केला असून एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी तुमचा चौकीदार राष्ट्राच्या सेवेसाठी मजबूतीने उभा आहे. परंतु मी एकटा नाही आहे. जो कोणी भ्रष्टाचार, अस्वच्छता, सामाजातील वाईट गोष्टींचा लढा देत आहे तो प्रत्येक जण चौकीदार आहे. जो कोणी भारताच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे तो प्रत्येक जण चौकीदार असल्याचे मोदींनी म्हटले आहे.