'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..'

Uddhav Thackeray Group On Modi, BJP: "भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 6, 2024, 08:25 AM IST
'भाजपाचा भटकता आत्मा..', ठाकरेंचा टोला; म्हणाले, 'मोदी-शाहांचा सभ्यता, संस्कृतीशी संबंध नसल्याने..' title=
ठाकरे गटाचा निकालावरुन हल्लाबोल

Uddhav Thackeray Group On Modi, BJP: भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे, अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाने नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला आहे. भारतीय मतदारांनी नरेंद्र मोदी तसेच भाजपाचा पचका केला असून त्यांना जवळपास सत्तेवरुन खाली खेचलं आहे असंही ठाकरे गटाने म्हटलं आहे. मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबड्यांवरचे बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावास मानवणारे नाही, असा शाब्दिक चिमटाही ठाकरे गटाने म्हटलं आहे.

निकालांनी मोदींना जमिनीवर आणले

'भाजपाचा भटकता आत्मा हा 240 जागांवरच लढत असतानाही बहुमत दिल्याबद्दल मोदींनी जनतेचे आभार मानले,' असा उल्लेख करत ठाकरे गटाने निशाणा साधला आहे. "नरेंद्र मोदी व त्यांच्या भाजपचा पुरता पचका लोकसभा निवडणुकांच्या निकालात झाला आहे. जनतेने त्यांना जवळ जवळ सत्तेवरून खाली खेचले आहे. ही खेचाखेची करताना जनतेने सभ्यता व संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचा गैरफायदा मोदी घेत आहेत. भारतीय जनता पक्षाला सरकार बनवण्याइतपत साधे बहुमतही मिळालेले नाही. 240 वरच त्यांचा भटकता आत्मा लटकताना दिसत आहे. तरीही मोदी यांनी बहुमत दिल्याबद्दल जनतेचे आभार मानले आहेत. लोकसभा निकालांनी मोदी यांना जमिनीवर आणले व त्यांनी सांगितले की, ‘माझ्या आईच्या मृत्यूनंतरची ही माझी पहिली निवडणूक आहे.’ चला, अखेर मोदी यांनी मान्य केले की, ते आकाशातील झग्यातून पडले नाहीत, तर त्यांचाही जन्म इतर मर्त्य मानवांप्रमाणे आईच्या कुशीतूनच झाला. मोदींना हे असे बोलण्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांच्या देवत्वाचा, अवतारगिरीचा व बाबागिरीचा मुखवटा खुद्द काशी नगरीतच जनतेने ओरबाडून काढला आहे," अशी टीका 'सामना'च्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.

कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय?

"मोदी हे आता त्यांच्या ‘ब्रॅण्ड’चे म्हणजे मोदी सरकार बनवत नाहीत तर त्यांनी ‘रालोआ’चे सरकार बनवत असल्याचे जाहीर करून स्वतःचा पराभव मान्य केला. ‘मोदी सरकार’, ‘मोदी गॅरंटी’, ‘मोदी है तो मुमकीन है’, ‘मोदी तो भगवान है,’ अशा फेकू कल्पनांना कालच्या निकालांनी केराची टोपली दाखवली. मोदी यांनी सरकार बनवलेच तर त्यांचे चित्र हे एक व्यंगचित्र असेल. संपूर्ण शरीरभर फॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत. त्या कुबड्यांच्या आधारेच त्यांना सरकार चालवावे लागेल. या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> 'मला सरकारमधून मोकळं करा!' लोकसभेतील पराभवानंतर फडणवीसांचे राजीनाम्याचे संकेत

भारतीय जनतेचा अत्यंत सभ्यपणे मोदींना सत्तेतून खाली उतरण्याचा संदेश

"मोदींच्या भाजपला 240 जागा मिळाल्याचे सांगितले जाते. या आकड्यातही घोळ आहे. एनडीए म्हणून 291 चा आकडा दाखवला जातोय तो फसवा आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा शपथ घेण्यासाठी मोदी यांनी बहुमताचा कागद राष्ट्रपती भवनात सादर केला तरी तो कागद व त्यावरील बहुमताचा आकडा म्हणजे त्यांच्या ‘एम.ए.’ इन एन्टायर पॉलिटिक्स या डिग्रीप्रमाणे रहस्यमय असेल. मोदींकडे स्वतःचे बहुमत नाही व कुबड्यांवरचे बहुमत मोदी यांच्या बाणेदार स्वभावास मानवणारे नाही. म्हणूनच भारतीय जनतेने अत्यंत सभ्यपणे मोदी यांना सत्तेवरून खाली उतरण्याचा संदेश दिला आहे. तुमचे काम झाले आहे. उगाच रेंगाळू नका व स्वतःची जास्त बेअब्रू करून घेऊ नका, पण ‘सभ्यता’ व ‘संस्कृती’ या दोन महान हिंदू शब्दांशी मोदी व शहा महाशयांचा संबंध आला नसावा म्हणून आता मोदींचे सरकार नाही, तर एनडीएचे सरकार बनवत असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसे झाले तर मोदी यांना अनेक कुबड्यांच्या अटी-शर्तींवर काम करावे लागेल," असं भाकित ठाकरे गटाने केलं आहे.

नक्की वाचा >> 'वाराणसीत जिंकताना दमछाक झाली', राऊतांचा मोदींना टोला; म्हणाले, 'तुमच्यापेक्षा अमित शाहांना...'

वाराणसीतील मदाधित्य हा देवाचा प्रसादच

"मोदी आतापर्यंत एनडीए वगैरे मानायला तयार नव्हते, पण काशीच्या देवांनी प्रभू श्रीरामांना त्यांच्यातला अहंकार संपविण्यासाठी एनडीएच्या चरणी आणले. मोदींना या वेळी राम पावला नाही. कारण श्रीराम हा अहंकाराचा शत्रू आहे व अहंकाराचा पराभव करून त्याने अयोध्येचे रामराज्य स्थापन केले. वाराणसीचा प्रचार संपताच मोदी यांनी 10 कॅमेऱ्यांसह ध्यान सुरू केले, पण वाराणसीत त्यांचे मताधिक्य जोरदार घसरले. हा देवाचा प्रसादच म्हणावा लागेल," असा खोचक टोला ठाकरे गटाने लगावला आहे.