'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...'

Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये अनेक घटकपक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना खरगे यांनी बैठकीतील चर्चेबद्दल माहिती दिली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 6, 2024, 07:43 AM IST
'इंडिया'कडून मोदींना मोठा दिलासा! मात्र खरगे म्हणाले, 'आम्ही योग्य वेळी योग्य...' title=
इंडिया आघाडीने घेतला मोठा निर्णय

Lok Sabha Election 2024 INDIA Bloc Meeting: दिल्लीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच एनडीएच्या बैठकीमध्ये 21 नेत्यांनी पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या घरी इंडिया आघाडीतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मल्लिकार्जून खरगेंनी सरकार स्थापन करण्यासाठी दावा करणार का यासंदर्भातील प्रश्नावर थेट उत्तर दिलेलं नाही. "आम्ही योग्य वेळी योग्य पावलं उचलू" असं खरगे म्हणाले आहेत. मात्र इंडिया आघाडी विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल असे संकेत खरगेंनी दिले आहेत. इंडिया आघाडीचा सत्ता स्थापनेचा दावा न करण्याचा हा निर्णय राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी आणि नरेंद्र मोदींसाठी मोठा दिलासा मानला जात आहे.

सूचक विधान

बैठकीत सर्व घटकपक्षांच्या प्रतिनिधींबरोबर झालेल्या चर्चेनंतर खरगेंनी इंडिया आघाडी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वखालील भारतीय जनता पार्टीविरोधातील संघर्ष करत राहील असं म्हटलं आहे. देशातील जनतेला भाजपाचं सरकार नकोय. त्यामुळेच इंडिया आघाडीकडून जनतेची इच्छा पूर्ण करण्यासाठी योग्य वेळी योग्य पावलं उचलली जातील, असं सूचक विधान खरगेंनी केलं.

त्या घटकांचं इंडिया आघाडीत स्वागत

"आम्ही उत्तम पद्धतीने त्यांना टक्कर दिली. आम्ही एकजूट दाखवली आणि दृढतेने त्यांच्याविरुद्ध लढलो," असं खरगे म्हणाले. "इंडिया आघाडीमध्ये त्या सर्व पक्षांचं स्वागत आहे जे संविधानाबद्दल जागृक आहेत," असं खरगेंनी म्हटलं. आता जनतेनं दिलेला कौल हा पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचं खरगेंनी आवर्जून नमूद केलं.

आम्ही लढत राहणार

इंडिया आघाडीतील सर्व घटकपक्ष देशातील जनतेचे आभारी असल्याचंही खरगेंनी सांगितलं. भाजपाचे नेते, त्यांच्या मार्फत पसरवला जाणारा द्वेष, भ्रष्टाचाराचं राजकारण या साऱ्याला जनतेनं दिलेलं सणसणीत उत्तर म्हणजे यंदाचा निकाल आहे, असंही खरगे म्हणाले. भारतामध्ये संविधानाचं संरक्षण करण्याबरोबरच महागाईविरोधात लढाई लढत राहील असं खरगेंनी सांगितलं. 

बैठकीत काय झालं?

"आमच्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर आणि मतदानानंतर निर्माण झालेल्या स्थितीवर वेगवेगळे सल्ले दिले. त्यावर सविस्तर चर्चा झाली. इंडिया आघाडी एवढ्या मोठ्याप्रमाणात भारतीयांनी दाखवलेल्या पाठिंब्यासाठी देशातील नागरिकांचे आभार मानते. जनतेने मतपेटीमधून भाजपा, त्यांचं द्वेषाचं राजकारण आणि भ्रष्टाचारच्या राजकारणाला सणसणीत उत्तर दिलं आहे," असं खरगे म्हणाले.

...पण आकडे आपल्या बाजूने नाहीत

"नैतिक पराभवानंतरही पंतप्रधान मोदींना लोकांच्या मनाविरुद्ध सत्ता स्थापन करायची आहे," असं खरगेंनी या बैठकीत म्हटल्याची माहिती समोर आली आहे. के.एम.डी.केचे सचिव ई. आर. इश्वरन यांनी, "जनमताचा कौल इंडिया आघाडीबरोबर आहे. मात्र सध्याची स्थिती आणि आकडेवारी आपल्या बाजूने नाही," असं बैठकीत म्हटलं. या बैठकीला एकूण 28 पक्षांचे नेते उपस्थित होते.

बैठकीला कोण कोण होतं उपस्थित?

इंडिया आघाडीच्या बैठकीला खरगेंबरोबरच सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे, प्रियंका गांधी वडेरा, ए. के. स्टॅलिन, अभिषेक बॅनर्जी, तेजस्वी यादव, राघव चड्ढा, डी. राजा, अखिलेश यादव, चंपई सोरेन आणि अन्य नेते उपस्थित होते.