नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात निवडणुकीचं बिगूल वाजलं आहे. देशातील 543 जागांसाठी 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. भाजप आणि काँग्रेससह सगळेच पक्ष कामाला लागले आहेत. प्रत्येक पक्षाने मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंबर कसली आहे. लोकसभा निवडणुकीची ही संपूर्ण प्रक्रिया अडीच महिन्यांची असणार आहे. येणाऱ्या 70 दिवसांमध्ये देशाचे पुढचे पंतप्रधान आणि दिशा ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप पुन्हा एकदा निवडणुकीच्या मैदानात असणार आहे. फिर एक बार मोदी सरकारचा नारा भाजपचा असणार आहे. तर काँग्रेस राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवणार आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या राज्यांमधील प्रादेशिक पक्ष देखील आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत.
देशात आचार संहिता लागू झाली आहे. यंदाची निवडणूक देशाची दिशा ठरवणारी असल्याची चर्चा आहे. सगळेच पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार करताना दिसणार आहेत. अनेक प्रादेशिक पक्षाने भाजप आणि काँग्रेससोबत हात मिळवणी केली आहे. भाजपने बिहारमध्ये जेडीयू आणि एलजेपी सोबत, महाराष्ट्रात शिवसेनेसोबत तर पंजाबमध्ये अकाली दलसोबत युती केली आहे. दक्षिण भारतात पहिल्यांदा भाजपने युती केली आहे. तमिळनाडुमध्ये भाजपने AIADMK आणि डीएमडीकेसोबत युती केली आहे. इतर दक्षिण राज्यांमध्ये भाजप स्वतंत्र निवडणूक लढवणार आहे.
काँग्रेसने देखील महाराष्ट्रात राष्ट्रवादीसोबत तर बिहारमध्ये आरजेडीसोबत आघाडी केली आहे. पश्चिम बंगालमध्ये लेफ्टसोबत काँग्रेस निवडणूक लढवणार आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेस जेडीएससोबत तर तमिळनाडूमध्ये डीएमकेसोबत निवडणूक लढवणार आहे. या शिवाय जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फ्रेंससोबत निवडणूक लढवणार आहे. यूपी, मध्य प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये सपा-बसपा एकत्र निवडणूक लढवत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या आधी करण्यात आलेल्या सर्वेमध्ये कोणत्याच पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही आहे. भाजपचा दावा आहे की त्यांना आधीपेक्षा अधिक जागा मिळतील. देशात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरत असला तरी सरकार स्थापनेसाठी मदत घेण्याची गरज भासणार आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. सपा-बसपा, टीएमसी, बीजेडी, टीडीपी, वायएसआर काँग्रेस आणि टीआरएस सारखे पक्ष किंगमेकर ठरणार आहेत. बहुमतासाठी 272 जागा आवश्यक आहेत.