गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान

लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये यंदा चुरसीची निवडणूक आहे. 

Updated: Apr 21, 2019, 05:20 PM IST
गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेच्या २ आणि विधानसभेच्या ३ जागांसाठी मतदान  title=

पणजी - गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकरांच्या मृत्यूनंतर गोव्यात यंदा पहिल्यांदाच लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या तीन जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेची चौथी जागाही पर्रिकरांच्या निधनामुळे रिकामी झाली आहे. विशेष म्हणजे यावेळची निवडणूक एकतर्फी नाही. सर्व मतदारसंघांतील निवडणुकांमध्ये चुरस आहे. उत्तर आणि दक्षिण गोवा असे दोन लोकसभा मतदारसंघ आणि विधानसभेच्या तीन मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. लोकसभेच्या दोन्ही मतदारसंघांमध्ये यंदा चुरसीची निवडणूक आहे. 

उत्तर गोव्यातून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक भाजपाकडून रिंगणात आहेत. ते पाचव्यांदा निवडणूक लढवत असून त्यांच्यासमोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आव्हान आहे. नाईक लोकसभा निवडणुक एकदाही हरलेले नाहीत, ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. मात्र चोडणकर प्रचाराच्या नवनव्या कल्पना राबवत आहेत ही देखील काँग्रेसच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. आम आदमी पार्टीकडून इथून दत्तात्रय पाडगावकर मैदानात आहेत. 

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. बहुतेक काँग्रेस उमेदवार दक्षिण गोव्यातून निवडून यायचे. त्या मतदारसंघातील सासष्टी तालुक्यात ख्रिस्ती मतदारांची संख्या बरीच मोठी असल्याने काँग्रेसच्या उमेदवाराच्या विजयाचा मार्ग सोप होत असेल. मात्र यावेळी काँग्रेसने ७३ वर्षीय फ्रान्सिस सार्दिन यांना तिकीट दिले व सार्दिन यांचा प्रचार थोडा उशिराच सुरू झाल्याने त्यात जोष दिसून येत नाही. दक्षिण गोव्यात भाजपाचा उमेदवार फक्त दोनवेळा जिंकला. एकदा रमाकांत आंगले जिंकले होते व २०१४ साली मोदी लाटेमुळे नरेंद्र सावईकर हे जिंकले. मात्र यावेळी सावईकर हे सार्दिन यांना जोरदार टक्कर देत आहेत. शिवाय आम आदमी पक्षाचे एल्वीस गोम्स हेही महत्त्वाचे उमेदवार आहेत. तेही ख्रिस्ती व हिंदू मते प्राप्त करतील. ख्रिस्ती मते जर त्यांनी जास्त प्राप्त केली तर सार्दिन यांच्यासाठी ती चिंतेची गोष्ट ठरू शकते. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर हे सार्दिन यांचा प्रचार करत आहेत. भाजपाचे सावईकर यांच्या प्रचारात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे उतरले आहेत. तर शिवसेनेकडून रेखा नाईक रिंगणात आहेत.