वाचलो! जाणून घ्या, लॉकडाऊनमुळं कोरोना संसर्गापासून दूर राहिलेल्यांचा आकडा

कोरोनाचा धोका वाढत असतानाच....

Updated: Sep 15, 2020, 08:23 AM IST
वाचलो! जाणून घ्या, लॉकडाऊनमुळं कोरोना संसर्गापासून दूर राहिलेल्यांचा आकडा title=
संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : जगभरात Coronavirus कोरोना विषाणूच्या संसर्गाचं थैमान सुरु असतानाच पाहता पाहता भारतावही या विषाणूनं हल्ला केला. जवळपास गेल्या सहा महिन्यांपासून सर्वच स्तरांवर याचे थेट परिणाम झाले. देशात लाखोंच्या संख्येनं कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर, त्यात काहींना आपले प्राणही गमवावे लागले. अशा परिस्थितीत कोरोनापासून नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी म्हणून केंद्र सरकारकडून काही टप्प्यांमध्ये देशव्यापी Lockdown लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ज्यावर कालांतरानं संमिश्र प्रतिक्रिया आल्या खऱ्या. पण, यामुळं लाखोंच्या संख्येनं देशातील नागरिकांना कोरोना संक्रमणापासून दूर ठेवणं शक्य झालं आहे. 

खुद्द केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी यासंदर्भातील माहिती दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळं देशातील १४ ते २९ लाख नागरिकांना याची बाधा होण्यापासून दूर ठेवला आलं आहे. तर, आतार्यंत ३७ ते ७८ हजार जणांचे मृत्यूही रोखणं शक्य झालं असल्याचा दावा डॉ. हर्ष वर्धन यांनी केला. 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी त्यांनी याबाबतची माहिती दिली. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी आणि वैद्यकिय सुविधा वाढवण्यासाठी लॉकडाऊन काळाचाच वापर झाला, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी त्यांनी पीपीई किट, एन- ९५ मास्क आणि व्हेंटिलेटरचं देशांतर्गत उत्पादन ही बाबही अधोरेखित केली. 

 

देशातील मृत्यूदर सर्वात कमी... 

भारतामध्ये कोरोना बाधितांची संख्या लक्षणीय रित्या वाढत असतानाही मृत्यूदर कमी राखण्यात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांना बऱ्याच अंशी यश आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दर १० लाख नागरिकांमागे कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूचं प्रमाण हे ३३२८ आणि ५५ इतकं कमी राखण्यात भारताला यश आल. परिमाणी जगातील इतर राष्ट्रांच्या तुलनेत ही संख्या कमीच असल्याचं ते म्हणाले. कोरोनाचे रुग्ण आणि मृतांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, पश्चिम बंगाल, बिहार, तेलंगणा, गुजरात अशा राज्यांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.