नवी दिल्ली : बिहारमध्ये आलेल्या राजकीय भूकंपानंतर लालूप्रसाद यादव आणि यादव कुटुंबांच्या तिखट प्रतिक्रिया समोर येताना दिसत आहेत.
लालूंच्या मुलींनीही ट्विटरवर आपला राग व्यक्त केलाय. विविध आरोप असलेल्या लालूंच्या मुली राजलक्ष्मी आणि चंदा यादव यांनी नीतिश कुमार यांच्या निर्णयावर आपला राग ट्विटरवर व्यक्त केलाय.
चंदा यादव यांनी ट्विट करून म्हटलंय, 'हे भ्रष्टाचाराचं प्रकरण नाही तर हा जातीय भेदभाव आहे. उच्च जात विरुद्ध यादव!! अन्यथा भाजपच्या भ्रष्ट नेत्यांवर प्रश्न का उभे केले गेले नाहीत?'
तर राजलक्ष्मी यादव यांनी तर अमित शाहांचा उल्लेख 'तडीपार शाह' म्हणून केलाय. 'नरेंद्र मोदींनी त्यांच्या तडीपार शाहांनादेखील राजीनामा द्यायला सांगावा' असं ट्विट राजलक्ष्मी यादव यांनी केलंय.
नीतीश कुमार यांच्या राजीनाम्यामागे भाजपचं राजकारण असल्याचं यादव कुटुंबियांचं म्हणणं आहे.
सध्या केंद्रीय चौकशी एजन्सीनं यादव कुटुंबीयांभोवती आपले फासे आवळलेत. कुटुंबातील अनेक सदस्यांवर अटकेची टांगती तलवार लटकलीय. आयकर विभागापासून अंमलबाजवणी संचलनालयापर्यंत सर्व अधिकारी कसून चौकशी करत आहेत. आत्तापर्यंत लालू आणि त्यांच्या कुटुंबीयांची करोडोंची संपत्ती जप्त करण्यात आलीय.