सोनिया गांधींना शह देण्यासाठी भाजपकडून कुमार विश्वास रिंगणात?

अमेठी व रायबरेली हे दोन्ही गांधी घराण्याचे परंपरागत मतदारसंघ आहेत.

Updated: Dec 14, 2018, 04:51 PM IST
सोनिया गांधींना शह देण्यासाठी भाजपकडून कुमार विश्वास रिंगणात? title=

नवी दिल्ली: आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला नामोहरम करण्यासाठी भाजपकडून एक अनपेक्षित डाव टाकला जाऊ शकतो. यासाठी भाजपकडून आम आदमी पक्षाचे (आप) नेते कुमार विश्वास यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु आहेत. 'टाईम्स ऑफ इंडिया'च्या माहितीनुसार, आतापर्यंत भाजपकडून या मोहिमेविषयी पूर्ण गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, ही माहिती फुटली असून त्यामधून भाजपची अनपेक्षित खेळी समोर आली आहे. कुमार विश्वास यांना पक्षात घेऊन त्यांना रायबरेली मतदारसंघात सोनिया गांधी यांच्याविरुद्ध रिंगणात उतरवण्याचा भाजपचा मानस आहे. दरम्यान, याविषयी कोणतीही अधिकृत माहिती पुढे येऊ शकलेली नाही. 

मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार भाजपकडून यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरु आहेत. रायबरेली हा मतदारसंघ ब्राह्मण व ओबीसीबहुल मतदारसंघ म्हणून ओळखला जातो. कुमार विश्वास हेदेखील ब्राह्मण आहेत. त्यामुळे भाजपचे बडे नेते कुमार विश्वास यांच्या संपर्कात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या १६ तारखेला रायबरेलीच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळीच कुमार विश्वास यांचा भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. 

कुमार विश्वास यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टक्कर दिली होती. त्यावेळी त्यांचा पराभव झाला होता. यानंतर कुमार विश्वास यांनी 'आप'कडून राज्यसभेवर जाण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र, पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. यामुळे नाराज झालेल्या कुमार विश्वास यांनी 'आप'ला रामराम ठोकला होता.

अमेठी व रायबरेली हे दोन्ही गांधी घराण्याचे परंपरागत मतदारसंघ आहेत. त्यामुळे भाजप नेतृत्वाकडून कायमच या दोन मतदारसंघावर कब्जा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी केंद्रातील अनेक नेत्यांनी या मतदारसंघाचे दौरे केले असून येथील विकासकामांवर कोटींचा खर्च करण्यात आला आहे. तर दुसरीकडे प्रकृती अस्वस्थ्यामुळे सोनिया गांधी बराच काळ रायबरेलीमध्ये फिरकलेल्या नाहीत. त्यामुळे यंदाची निवडणूक रायबरेली मतदारसंघात विजय मिळवण्याची नामी संधी असल्याचा भाजपचा अंदाज आहे. त्यासाठी भाजपकडून कुमार विश्वास यांच्यासारखा तगडा प्रतिस्पर्धी रिंगणात उतरवला जाऊ शकतो. याशिवाय, सोनिया गांधी यांचे माजी विश्वासू सहकारी दिनेश सिंह आणि रिटा बहुगणा जोशी यांच्या नावाचाही विचार सुरु असल्याचे कळते.