Kolkata Rape and Murder: कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी संजय रॉय याची पॉलिग्राफ टेस्ट करण्यात आली असून, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. लाय डिटेक्टर टेस्टमध्ये संजय रॉयने सीबीआयला सांगितलं की, गुन्ह्याआधी आपण मित्रासह देहविक्री चालणाऱ्या परिसरात गेलो होतो. मात्र तिथे आपण शरीरसंबंध ठेवले नाहीत असं त्याने म्हटलं आहे. संजय रॉयने यावेळी रस्त्यावर आपण आणखी एका महिलेची छेड काढली होती अशी कबुलीही दिली आहे. 'इंडिया टुडे'ने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
वृत्तानुसार, संजय रॉयने आपल्या प्रेयसीला व्हिडीओ कॉल करुन न्यूड फोटो पाठवण्याची मागणी केली आहे. तसंच गुन्हा घडला त्या रात्री संजय रॉयने आपल्या मित्रासह मद्यप्राशन केलं होतं. यानंतर ते रेड लाईट एरिया म्हणजेच देहविक्री चालणाऱ्या परिसरात गेला होता. यानंतर तो दक्षिण कोलकात्यामधील चेतला या ठिकाणीही गेले होते. तेथून परतत असताना त्यांनी एका मुलीची छेड काढली होती.
यानंतर ते रुग्णालयात परतले होते. संजय रॉय नंतर पहाटे 4 वाजून 3 मिनिटांनी सेमिनार हॉलजवळ असणाऱ्या कॉरिडोअरमध्ये गेला होता. तिथे कथितरित्या बलात्कार आणि हत्या केल्यानंतर तो आपला मित्र अनुपम दत्ता याच्या घरी गेला अशी माहिती पोलिसांनी दिल्याचं 'इंडिया टुडे'ने म्हटलं आहे.
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाने रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, संजय रॉयने दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता. पण पॉलिग्राफ मशीनने ते सिद्ध केलं. आरोपीला पॉर्नोग्राफीचे तीव्र व्यसन असल्याचं उघड झालं असून त्याच्या फोनवर अनेक अश्लील क्लिप सापडल्याचं सीबीआयने सांगितलं आहे.
पीडित तरुणी सेमिनार हॉलमध्ये विश्रांतीसाठी गेली होती तेव्हा तिच्यावर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिच्या शरीरावर 25 बाह्य आणि अंतर्गत जखमा होत्या. तिचा निर्घृण खून करण्यात आला. वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ संदीप घोष यांच्या भूमिकेचीही सीबीआय चौकशी करत आहे. शनिवारी त्यांचीही लाय डिटेक्टर चाचणीही करण्यात आली.
गेल्या आठवड्यात, सुप्रीम कोर्टाने कोलकाता पोलिसांना एफआयआर नोंदवण्यासाठी 12 तासांचा अवधी का घेतला, असा प्रश्न विचारला होता. संदीप घोष यांनी बलात्कार आणि हत्येला आत्महत्या दर्शवत प्रकरण दाबवण्याचा प्रयत्न केला, असंही त्यात म्हटले आहे. सीबीआय संदिप घोष यांच्यावरील आर्थिक अनियमिततेच्या आरोपांचीही चौकशी करत आहे.