मोठी बातमी! अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण

Amritpal Singh Surrenders: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 18 मार्चपासून तो फरार होता.  

शिवराज यादव | Updated: Apr 23, 2023, 07:37 AM IST
मोठी बातमी! अमृतपाल सिंगला अखेर अटक, पोलिसांसमोर केलं आत्मसमर्पण title=

Amritpal Singh Surrenders: खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग (Amritpal Singh) याला पकडण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. अमृतपाल सिंगने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोगा पोलिसांसमोर त्याने आत्मसमर्पण केलं आहे. 18 मार्चपासून अमृतपाल सिंग फरार होता. अमृतपाल सिंग याने त्याची संघटना 'वारीस पंजाब दे'च्या सदस्यांसह पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. मात्र अमृतपाल सिंग फरार झाला होता. वेषांतर करत तो पोलिसांना चकवा देत होता. पण अखेर त्याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. 

अमृतपाल आणि त्याच्या सहकाऱ्यांवर समाजात वितुष्ट पसरवणे, खुनाचा प्रयत्न, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यात अडथळे निर्माण करणे अशा अनेक फौजदारी खटल्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमृतपालने रात्री उशिरा मोगा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. अमृतपालला पकडण्यासाठी पंजाब पोलिसांनी नेपाळच्या सीमारेषेपर्यंत कारवाई केली होती. पण पोलिसांना यश आलं नव्हतं. अनेकदा तर त्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला होता. यादरम्यान अमृतपाल सिंगने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक व्हिडीओ जारी केले होते. यावेळी तो आत्मसमर्पण करणार असल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. 

दुसरीकडे अमृतपालला पकडण्यासाठी पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या होत्या. पंजाब हरियाणा कोर्टानेही पोलिसांना अमृतपालला पकडण्यात अपयशी ठरत असल्याने फटकारलं होतं.  

पंजाब पोलिसांनी याआधी अमृतपाल सिंगचा जवळचा सहकार पप्पलप्रीत याला अमृतसर येथून अटक केली होती. आपल्याला अमृतपालबद्दल काही माहिती नसल्याचा जबाब त्याने पोलिसांना दिला होता. अमृतपाल आत्मसमर्पण करेल की नाही याबद्दल मला काही माहिती नाही असं त्याने सांगितलं होतं. 28 मार्चला आपण वेगळे झाल्याची माहिती त्याने दिली होती. 

अमृतपालने नेमकं काय केलं होतं?

23 फेब्रुवारीला अमृतपाल सिंग चर्चेत आला होता. त्याने आपल्या काही सहकाऱ्यांना सोडवण्यासाठी हजारो समर्थकांसह अजनाला पोलीस स्थानकावर हल्ला केला होता. यामध्ये सहा पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर त्याने काही वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत वेगळ्या खलिस्तानची मागणी केली होती. इतकंच नाही तर अमृतपालने देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनाही धमकी दिली होती. 

कोण आहे अमृतपाल सिंग ?

अमृतपाल सिंग हा 'वारिस पंजाब दे' या संघटनेचा प्रमुख आहे. खलिस्तान या वेगळ्या देशाची त्याची मागणी आहे. तो दुबईहून परतला आहे. 'वारिस पंजाब दे' ही संघटना पंजाबी अभिनेता दीप सिद्धूने तयार केला आहे. दीप सिद्धूच्या मृत्यूनंतर अमृतपाल सिंगने संघटनेचा ताबा घेतला. त्याने भारतात येऊन लोकांना संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न केला. अमृतपाल आयएसआयशी जोडल्याचा आऱोप आहे.