Khakee: The Bihar Chapter : सध्या अनेक महत्त्वाच्या व्यक्तींच्या बायोपिकची चलती असल्याचे पाहायला मिळतय. अनेक बायोपिक चित्रपटांना मोठी प्रसिद्धी देखील मिळाली आहे. एका आयपीएस अधिकाऱ्याच्या पुस्तकावर तयार करण्यात आलेली वेबसीरिज सध्या धुमाकूळ घालतेय. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'खाकी: बिहार चॅप्टर' या वेबसीरिजमुळे एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बिहारच्या विशेष दक्षता युनिटने आयपीएस अधिकारी अमित लोढा (ips amit lodha) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कमावला काळा पैसा
नेटफ्लिक्सच्या 'खाकी: द बिहार चॅप्टर' या वेब सीरिजमधून प्रसिद्धीझोतात आलेले आयपीएस अधिकारी अमित लोढा यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या माध्यमातून संपत्ती कमावल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर आता सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. खाकी: द बिहार चॅप्टर 25 नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. या वेब सीरिजसाठी एका खासगी कंपनीसोबत करार केल्यानंतर अमित लोढा प्रसिद्धीच्या झोतात आले.
प्राथमिक तपासात, अमित लोढा यांनी सरकारला दिलेल्या वार्षिक मालमत्तेच्या तपशिलात त्यांनी आपल्या कमाईच्या साधनांचा उल्लेख केलेला नाही, असे समोर आले आहे. या वेब सीरिजच्या निर्मितीत काळा पैसा लावल्याचे समोर आले आहे.
सेवेत असूनही चित्रपट निर्मिती
अमित लोढा हे सेवेत असल्याने ते वेब सीरिजसाठी कोणत्याही फर्मशी करार करू शकत नाहीत. अमित लोढा यांनी पत्नी कौमुदी लोढा यांच्या नावावर असलेल्या बँक खात्यांमध्ये लाखो रुपयांचा काळा पैसा टाकला. चित्रपट बनवणाऱ्या फ्रायडे स्टोरी टेलर प्रायव्हेट लिमिटेड व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांकडून लाखो रुपये आले आहेत. या प्रॉडक्शन हाऊसच्या वतीने 27 डिसेंबर 2017 रोजी साडेचार लाख रुपये आणि 26 मार्च 2018 रोजी सहा लाख 75 हजार रुपये हस्तांतरित करण्यात आले होते. प्रॉडक्शन हाऊसने मार्च 2019 ते सप्टेंबर 2019 दरम्यान कौमुदी लोढा यांच्या खात्यात 38 लाख 25 हजार रुपये पाठवले.
बँक खात्यांमधून लाखो रुपये वळवले
अमित लोढा यांनी आपला काळा पैसा योग्य स्वरुपात आणण्यासाठी वेब सिरीज किंवा फिल्म मेकिंग कंपन्यांना माध्यम बनवले. फिल्म मेकिंग कंपन्यांना काळा पैसा देऊन, लोढा यांनी त्यांच्या पत्नी आणि इतरांच्या बँक खात्यांमध्ये चित्रपट निर्मितीच्या नावावर लाखो रुपये टाकले. जेणेकरून त्यांना आणि त्यांच्या पत्नीला वेब सीरिज बनवण्यासाठी पैसे मिळाल्याचे दाखवता येईल. नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2022 दरम्यान, फ्रायडे स्टोरी टेलर आणि लॉस गॅटोस प्रोडक्शन सर्व्हिस इंडिया-एलएसपी सोबत अनेक करारांवर स्वाक्षरी करण्यात आली. त्यानंतर लगेचच या कंपन्यांच्या खात्यातून अनेक वेळा त्यांच्याकडे पैसे ट्रान्सफर करण्यात आले. ही रक्कम 50 लाख रुपयांपेक्षा अधिक होती.