केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ!

KG Admission Fees: एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

Pravin Dabholkar | Updated: Dec 8, 2023, 04:07 PM IST
केजीच्या मुलाची फी पावती पाहिली का? मुलांना शिकविण्यासाठी घर, जमीन विकण्याची वेळ! title=

KG Admission Fees: सध्या महागाई खूप वाढली आहे. विशेषत: आरोग्य आणि शिक्षण खूप महागले आहे. या दोन गोष्टीत कोणी तडजोड करायला मागत नाही. त्यामुळे यातून बक्कळ पैसा कमावण्यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत असते.  आजकाल चांगल्या शाळेच्या केजीच्या वर्गात प्रवेश मिळणे म्हणजे नशिबाची गोष्ट  बनत चालली आहे. एकदा प्रवेश मिळाला की मुलांचीच नव्हे तर पालकांचीही पूर्वीपेक्षा जास्त जबाबदारी असते. पण अशा शाळांच्या फीसबद्दल तुम्हाला माहिती आहे का? 

अनेक शाळांमध्ये केजीची फी इतकी जास्त आहे की सर्वसामान्यांना ती भरणे अजिबात सोपे नाही. केजीच्या मुलांची फी हजार किंवा त्याहून जास्त असेल याचा अंदाज लोक लावू शकतात. पण एकट्याची प्रवेश फी दीड लाख रुपये असेल तर? अशावेळी आपल्या पाल्याचा शाळेत प्रवेश घेण्यापुर्वी शंभर वेळा तरी विचार करावा लागेल. वर्षभराच्या फीचा अंदाज घेतला तर काही लोकांच्या मते या किमतीत मुलांना केजी-नर्सरीमध्ये शिकण्यासाठी आपली जमीन आणि मालमत्ता विकावी लागेल.

KG च्या मुलांची फी

एका शाळेने आपल्या केजी वर्गासाठी पालकांकडून 'ओरिएंटेशन फी' आकारली. ती फी पाहून अनेक पालकांची झोपच उडाली. 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी ज्युनियर केजी बॅचची फी रचना पाहून लोकांना धक्का बसला. फी स्ट्रक्चरचा एक फोटो सध्या सोशल मीडियात व्हायरल होतोय.  'पॅरेंट ओरिएंटेशन फी' असे या रिसिप्टवर लिहिले आहे.  या फोटोने संपूर्ण इंटरनेटवर खळबळ उडवून दिली. हा फोटो पाहून नव्याने बनलेल्या पालकांची भांबेरी उडाली असून त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही येत आहेत. 

फी कशी घेतली गेली?

फोटोत दिसणाऱ्या फी रिसिप्टमध्ये विविध प्रकारचे शुल्क घेण्यात आले आहे. चित्रात दाखविलेल्या तपशिलानुसार, प्रवेश शुल्क 55 हजार 638 रुपये, कॉसाइन मनी 30 हजार 19 रुपये, वार्षिक शुल्क 28 हजार 314 रुपये, विकास शुल्क 13 हजार 948 रुपये, शिक्षण शुल्क 23 हजार 737 रुपये आणि पालक ओरिएंटेशन फी रु 8400 आहे.

लोकांच्या प्रतिक्रिया 

ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून लोक अनेक प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका यूजरने गंमतीने लिहिले की, "अरे, ही नर्सरी आहे की बी.टेक." दुसर्‍याने हसून लिहिलं, येथे प्रवेश घेण्यासाठी "हप्त्यात पैसे देता येत नाहीत का?"  माझी दहावीची फी दरमहा 500 रुपये होती, मला वाटायचे मी महागड्या शाळेत शिकायचो, अशी कमेंट तिसऱ्या युजरने केली आहे.