महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेची कारवाई

तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द झाली आहे.  पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेने ही कारवाई  केली आहे. 

वनिता कांबळे | Updated: Dec 8, 2023, 03:44 PM IST
महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द, पैसे घेऊन प्रश्न विचारल्याच्या आरोपानंतर संसदेची कारवाई  title=

Mahua Moitra Expulsion Report : तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. संसदेच्या एथिक्स पॅनलने कॅश फॉर क्वेरी प्रकरणात (संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेण्याच्या आरोपात) दोषी ठरवले होते. तसेच खासदारकी रद्द करण्याची शिफारस केली होती. त्यानुसारच, त्यांची ही खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला आहे.

काय आहे कॅश फॉर क्वेरी प्रकरण

पश्चिम बंगालमधील TMCच्या खासदार महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्यात आली ते कॅश फॉर क्वेरी प्रकरण नेमकं आहे तरी काय हे जाणून घेवूया.  कॅश फॉर क्वेरी प्रकरणात मोईत्रा चांगल्याच अडकल्या आहेत. पैशांच्या बदल्यात प्रश्न विचारल्या प्रकरणी मोईत्रांवर ठपका ठेवण्यात आला होता. तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रांवर उदयोजकांकडून पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. त्या प्रकरणी नेमलेल्या एथिक्स कमिटीनं त्यांना दोषी ठरवत, त्यांच्या निलंबनाची शिफारस केली होती. एथिक्स कमिटीचा हा अहवाल स्वीकारुन, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. दरम्यान या प्रकरणी आपल्याला संसदेत बोलू दिलं नाही असा आरोप, कारवाईनंतर बोलताना महुआ मोईत्रा यांनी केला. 

मुंबईतील एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरून मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारल्याचा भजाप खासदाराचा आरोप

भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर गंभीर आरोप केलेत. मुंबईतील एका व्यावसायिकाच्या सांगण्यावरून मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारले..प्रश्न विचारल्या बदल्यात त्यांना रोख रक्कम, भेटवस्तू दिल्याचा दावा निशिकांत दुबे यांनी केला. तसंच याप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी लोकसभाध्यक्षांकडे केलीय. 

 नीतीमत्ता समितीतून विरोधी पक्षाच्या खासदारांचे वॉकआऊट

संसदेच्या नीतीमत्ता समितीतून विरोधी पक्षाच्या खासदारांनी वॉकआऊट केलं. लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी TMC खासदार महुआ मोईत्रा यांची चौकशी या समिती समोर झाली. मात्र, एका महिलेला वैयक्तिक प्रश्न विचारले जात असल्याचा आरोप महुआ यांनी केला. त्यांच्यासह BSP खासदार दानिश अली यांनीही समितीमधून वॉकआऊट केले.  या चर्चेवेळी तृणमूलचे खासदार महुआ मोईत्रा यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ झाला. भाजपाचे विरोधक म्हणजे अँटी नॅशनल असल्याप्रमाणे वागवलं जातं असल्याचं विधान मोईत्रा यांनी केले.