मुंबई : केरळमधील कोझिकोडजवळील कारीपुर येथील विमानतळावर दुर्घटनाग्रस्त झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेस विमानातील चालक दलातील चार कर्मचारी सुरक्षित आहेत. राष्ट्रीय विमान कंपनीने शनिवारी याबाबत माहिती दिली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार, चालक दलातील चार कर्मचारी सुरक्षित असून क्रॅश लँडिंगच्यावेळी त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही. आता त्यांना कोझिकोड रूग्णालयात दाखल केलं असून उपचार सुरू आहे.
दुबईहून भारतात येत असलेल्या १९० प्रवाशांना घेऊन हे एअर इंडियाचे विमान शुक्रवारी भरपूर पावसादरम्यान लँडिंग करत असताना धावपट्टीवरून विमान घसरलं आणि ते ३५ फूट खाली कोसळलं. या अपघातात १८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. हे विमान खाली कोसळलं तेव्हा त्याचे दोन तुकडे झाले.
या अपघातात मृत्यू झालेल्यां लोकांमध्ये पायलट-इन-कमांड कॅप्टन दीपक साठे आणि त्याचा सह-पायलट कॅप्टन अखिलेश कुमार हेही आहेत. दीपक साठे हे भारतीय वायुसेना (आयएएफ) चे माजी विंग कमांडर होते आणि त्यांनी हवाई दलाच्या उड्डाण चाचणी आस्थापनामध्ये काम केले होते.
कोझिकोड येथे झालेल्या अपघातात देशाने दोन शूर पायलट गमवले. अपघातात 59 वर्षीय दीपक वसंत साठे आणि 33 वर्षीय कॅप्टन अखिलेश कुमार यांचा मृत्यू झाला. दीपक साठे यांची गणना देशातील सर्वोत्तम वैमानिकांमध्ये केली जाते.
हवाई दलाचा अनुभव आणि कार्यक्षम विमानप्रवासाच्या अनुभवावरुन दीपक यांनी कोझिकोड विमानतळावर विमानाला वाचविण्यासाठी बरेच प्रयत्न केल्याचे सांगण्यात येत आहे. सुदैवाने विमानाला आग लागली नाही. ज्यामुळे मोठी जिवीतहानी टळली.
एअर इंडियासाठी काम करणारे दीपक हे एकेकाळी हवाई दल अकादमीचे बेस्ट कॅडेट म्हणून ओळखले जात होते. दीपक साठे यांनाही त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर वायुसेना अकादमीकडून प्रतिष्ठित 'स्वर्ड ऑफ ऑनर' पुरस्कार मिळाला होता. हवाई दलाच्या नोकरीनंतर दीपक एअर इंडियाच्या व्यावसायिक सेवेत रुजू झाले. पायलट दीपक साठे यांचे वडील सैन्यात ब्रिगेडियर होते. त्याच वेळी त्यांचा एक भाऊ कारगिल युद्धात शहीद झाला होता.
एअर इंडियाचे एअरबस 310 विमान आणि बोईंग 737 अशी विमानं उड्डाण करणारे दीपक साठे हे देशातील मोजके पायलटांपैकी एक होते. कोझिकोड अपघातामुळे देशाने दोन सर्वोत्कृष्ट पायलट गमावले.