मृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर

Kerala 10th Topper : केरळ बोर्डाने शुक्रवारी दहावीचा निकाल जाहीर केला आणि संपूर्ण राज्यात एकच शोककळा पसरली. दोनच दिवसांपूर्वी मृ्त्यू झालेल्या सारंगने दहावीत अव्वल स्थान मिळवले होते. निकाल सांगताना शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर झाले होते. 

आकाश नेटके | Updated: May 21, 2023, 02:51 PM IST
मृत्यूनंतरही 10वीच्या टॉपरने 6 जणांचा वाचवला जीव! शिक्षण मंत्र्यांनाही अश्रू अनावर title=

Shocking News : अवयवदान (organ donation) किती महत्त्वाचं आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. एका व्यक्तीच्या अवयवदानामुळे दुसऱ्या व्यक्तीचं अख्खं आयुष्य सुरळीत चालू शकतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अवयवदानाविषयी जागृती केली जात असते. मात्र स्वतःच्या जवळच्या व्यक्तीचे अवयव त्याच्या मृत्यूनंतर त्याच्यापासून वेगळे करुन दुसऱ्या व्यक्तीला देणे याची कल्पना करुनच अनेकांच्या अंगावर काटा येतो. मात्र केरळच्या एका दाम्पत्याने मुलाच्या मृत्यूनंतर त्याचे अवयवदान करुन सहा जणांना जीवनदान दिलं आहे. पालकांच्या या धाडसी निर्णयानंतर त्यांचे कौतुक केले जात आहे.

केरळमधील (Kerala) या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. शुक्रवारी दहावीचा (10th Result) निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यभरात आनंदाचे वातावरण होते. मात्र परीक्षेत अव्वल आलेल्या सारंग नावाच्या मुलाच्या मृत्यूने सर्वच जण हळहळले होते. निकाल जाहीर करताना केरळचे शिक्षणमंत्री व्ही शिवनकुट्टी यांचेही डोळेही पाणावले होते. दहावीत अव्वल असलेल्या सारंगने स्वतःचा जीव गमावूनही काही कुटुंबांना मोठा आनंद दिला आहे. त्यामुळे या मुलाचा आणि त्याच्या पालकांचा सर्वांनाच अभिमान वाटत आहेत.

16 वर्षांचा सारंग अभ्यासात हुशार होता. त्याने दहावीच्या बोर्ड परीक्षेत सर्व विषयांमध्ये अव्वल गुण मिळवले होते. केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवकुट्टी यांनीही सारंगचे कौतुक केले. मात्र सारंगच्या घरावर शोककळा पसरली आहे. 16 वर्षे प्रेमाने वाढवलेला सारंग आता या जगात नाही. मात्र सारंगने जगाचा निरोप घेऊन सहा जणांना नवीन जीवन दिलं आहे.

गेल्या बुधवारी केरळमध्ये 16 वर्षीय सारंगचा रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास सारंग कल्लंबलम-नागरूर रस्त्यावरुन तो ऑटो रिक्षाने घरी जात होता. त्यावेळी ऑटोचालकाचे नियंत्रण सुटले आणि ऑटो विद्युत खांबाला धडकून रस्त्यावर उलटला. या अपघातानंतर सारंग कोमामध्ये गेला होता. मात्र ब्रेन डेड झाल्याने बुधवारी त्यांचे निधन झाले. सारंगच्या अचानक जाण्याचं दु:ख असतानाही त्याच्या पालकांनी संयम राखून अनेकांचे प्राण वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सारंगचे अवयव 6 जणांना दान केले. आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फेसबुक पोस्ट लिहीत, सारंगच्या पालकांनी त्याचे दोन मूत्रपिंड, एक यकृत, एक हृदयाची झडप आणि दोन कॉर्निया दान केले आहेत अशी माहिती दिली.

सारंगचा निकाल सांगताना शिक्षणमंत्रीही भावूक...

शुक्रवारी, राज्याचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी दहावीचा निकाल जाहीर केला. त्यावेळी सारंगने सगळ्या विषयात अव्वल गुण मिळवले आहेत हे सांगतांना त्यांनाही गहिवरुन आले. पत्रकार परिषदेत एसएसएलसीचा निकाल जाहीर करताना ते भावूक झाले. बी.आर.सारंगने अव्वल गुण मिळवल्याचे त्यांनी सांगितले.