कारने १५ मिनिटे अडविला रुग्णवाहिकेचा रस्ता, बालक अत्यवस्थ

रुग्णवाहिका बराचवेळ रस्त्यात अडकून राहिली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या कार चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Oct 21, 2017, 01:09 PM IST
कारने १५ मिनिटे अडविला रुग्णवाहिकेचा रस्ता, बालक अत्यवस्थ title=

नवी दिल्ली : केरळमध्ये गंभीर अवस्थेत जन्माला आलेल्या नवजात बाळाला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेला एका कारमूळे खोळंबून रहावे लागले. रुग्णवाहिकेने हॉर्न वाजवूनही त्या कारने कोणतीच दाद दिली नाही.  रस्ता करुन न देता ही कार स्वत:च पुढे चालत राहिल्याचे समोर आले आहे. यामुळे रुग्णवाहिका बराचवेळ रस्त्यात अडकून राहिली. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्या कार चालकावर कारवाई करण्यात आली आहे.

'द हिंदू'मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीनुसार,  हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इरनाकुलम येथील पोलिसांनी अलुवा पॉवर हाऊस रोड येथे राहणाऱ्या निर्मल जोश याच्याविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने बाळाला पेनांबवुर येथील खाजगी रुग्णालयातून सरकारी मेडिकल कॉलेजला उपचारासाठी नेण्यात येत होते. 

ही मिनी एसयूव्ही पेरंबवुर-अलुवा रस्त्यावर जीटीएन जंक्शनजवळ रुग्णवाहिकेला ओव्हरटेक करुन पुढे गेली. त्यानंतर १५ मिनिटापर्यंत रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास रस्ता दिला नाही.  KL १७ L २०२ नंबर असलेली कार रुग्णवाहिकेच्या मार्गात अडथळा आणत होती. या कारने आम्हाला पुढे जाण्यास रस्ता दिला नाही. या कारणाने कलमस्सेरी येथे पोहचण्यासाठी साधारण ३५ मिनिटे लागल्याचे रुग्णवाहिकाचा ड्रायव्हर मधू याने सांगितले. इतरवेळेस या रोडवरुन जाण्यासाठी केवळ २० मिनिटे पुरेशी असतात असेही तो म्हणाला.

दरम्यान कार चालक निर्मल जोशवर बेदराक आणि निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो सध्या फरार असून त्याला शोधण्यासाठी पोलिस पथके तैनात करण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.  गुरुवारी अलुवाच्या उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जोश याला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
ही घटना १८ ऑक्टोबर ची असल्याचे समजते. आरोपी हा रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास रस्ता देत नसल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ रुग्णवाहिकेच्या ड्रायव्हरने बनविला आहे.