मुंबई : जम्मू- काश्मीर परिसरात सैन्यदल आणि लष्कर-ए-तोयबामध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांच्या कंठस्नान घालण्यास सैन्यदलाला यश आलं आहे. जवळपास १८ तास चालेल्या या चकमकीत श्रीनगरनजीक असणाऱ्या मुजगुंड येथे या दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं. ९ डिसेंबरला ही कारवाई करण्यात आली.
ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एक युवक हा अभिनय क्षेत्रात सक्रिय असून, 'हैदर' या चित्रपटात एका लहान भूमिकेत झळकला होता. साकिब बिलाल असं त्याचं नाव असून, एका ९ वर्षीय मुलासोबत तो ३१ ऑगस्टपासून आपल्या घरातून पळाला होता. ते दोघंही हाजीन बंडीपोरा या शाळेत शिकत होते.
लष्कर-ए-तोयबाशी जोडला गेलेल्या साकिबच्या कुटुंबीयांनी त्याला महिनाभर शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या मुलाच्या रक्षणासाठी दिवस- रात्र त्याची आई प्रार्थना करत होती. पण, अखेर तो दहशतवादी संघटनेशी जोडला गेल्याचं सत्य त्याच्या कुटुंबीयांसमोर आलं आणि त्यांना धक्काच बसला.
'हिंदुस्तान टाईम्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 'त्याला अभियांत्रिकी अभ्यासक्रमात रस होता. त्यामुळे तो अशा मार्गाला कसा गेला याविषयीच आम्हीही विचाराधीन गेलो आहोत. ज्या दिवशी तो घरातून निघून गेला तेव्हाही घरातील काही सामान आणण्याच्या कारणानेच तो बाहेर पडला होता. त्यावेळी स्थानिकांनी त्या दोघांनाही एका तिसऱ्याच व्यक्तीसोबत दुचाकीवरुन जाताना पाहिलं होतं', असे त्याचे मामा असिम ऐजाज म्हणाले.
असिम यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी इयत्तेत असताना साकिब अत्यंत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यासोबतच त्याला फुटबॉल या खेळाची आवड होती, किंबहुना तो स्वत: तायक्वांडो आणि कबड्डी हे खेळ खेळत होता. साकिब हा मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. तर, त्याच्यासोबत ठार करण्यात आलेला दुसरा मुलगा हा अत्यंत गरीब कुटुंबातील होता. या दोघांच्याही मृत्यूमुळे कुटुंबीयांना जबर धक्काच बसला आहे.
सहावी इयत्तेत असतेवेळी तो विशाल भारद्वाज दिग्दर्शित 'हैदर' या चित्रपटातून झळकला होता. अभिनेता शाहिद कपूर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. दोन महत्त्वाच्या दृश्यांमध्ये त्याची भूमिका पाहायला मिळाली होती. याशिवाय चित्रपटापूर्वी त्याने 'वेथ ची येही' (This is the river) या स्टेज शोमध्येही काम केलं होतं. ज्यासाठी त्याचा गौरवही करण्यात आला होता, अशी माहितीही त्याच्या नातेवाईकांनी दिली.
दरम्यान, पोलिसांकडून मिळालले्या माहितीनुसार घरातून पळून गेल्यानंतर लगेचच या दोघांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश केला होता. भारतीय लष्कराकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर जम्मू-काश्मीर परिसरात स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोषाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दहशतवादी कारवायांमध्ये तरुण मुलांना समाविष्ट करणाऱ्या संघटनानांवर आणि त्याच तरुणांना ठार करणाऱ्या भारतीय लष्कराच्या भूमिकेबाबतत स्थानिकांमध्ये चीड पाहायला मिळत आहे.