कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालां कडे सोपवला.  

ANI | Updated: Jul 23, 2019, 10:36 PM IST
कुमारस्वामी यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा, सत्तेसाठी भाजपचा दावा  title=

बंगळुरु : मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी कर्नाटकचे राज्यपाल वाजूभाई वाला यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा वाजूभाई वाला यांच्याकडे सोपवला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा स्विकारला. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यासोबत उपमुख्यमंत्री जी परमेश्वर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डी. के. शिवकुमार आणि  रेवन्ना उपस्थित होते. दरम्यान, उद्या भाजप सत्ता स्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

कर्नाटकातील कुमारस्वामी यांचे सरकार पडले

कुमारस्वामी सरकारने विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर मुख्यमंत्री कुमारस्वामी राजभवनात पोहोचले आणि त्यांनी आपला राजीनामा राज्यपालाकडे सोपविला. विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी  भाजपच्या बाजूने १०५ मते मिळाली, तर कुमारस्वामी सरकारला ९९ मते मिळाली. २३ मे २०१८ रोजी कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांचे सरकार स्थापन झाले होते. काँग्रेस आणि जेडीएस यांचे संयुक्त सरकार स्थापन करण्यात आले होते.

कुमारस्वामी सरकार पडल्यानंतर भाजपचे नेते येडियुरप्पा यांनी हा जनतेचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया दिली. भ्रष्टाचारी आणि अपवित्र आघाडी सरकारचा अंत झाला आहे. आम्ही तुम्हाला स्थिर आणि सक्षम सरकार देऊ. आम्ही मिळून कर्नाटकला समृद्ध बनविणार आहोत. आता राज्यात विकास एक नवे पर्व सुरू होईल, असे ते म्हणालेत.