तरंगणाऱ्या पुलावर चालण्याचं स्वप्न पाण्यात, उद्घाटनानंतर 3 दिवसांत मोठी दुर्घटना

उद्घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी फ्लोटिंग पूल वाहून गेला

Updated: May 11, 2022, 03:36 PM IST
तरंगणाऱ्या पुलावर चालण्याचं स्वप्न पाण्यात, उद्घाटनानंतर 3 दिवसांत मोठी दुर्घटना title=

उडपी : कर्नाटकच्या उडपीमध्ये पहिला पाण्यावर तरंगणारा पूल उभारण्यात आला होता. मात्र उद्घाटनाच्या तिसऱ्याच दिवशी हा पूल वाहून गेला. 6 मे रोजी आमदार के रघुपती भट यांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र मिळालेल्या माहितीनुसार, 8 मेच्या रात्री पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पूल वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत पुलाचे तुकडे पाण्यावर तरंगताना दिसत होते. 

पुलासाठी तब्बल 80 लाख रुपयांचा खर्च - 

उडपीच्या मलपे बीचवर फ्लोटिंग म्हणजेच पाण्यावर तरंगणारा पूल उभारण्यात आला होता. पूल बांधण्यासाठी तब्बल 80 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. कर्नाटकात पर्यटन वाढण्यासाठी हा फ्लोटिंग पूल बांधण्यात आला होता. 100 मीटर लांब आणि 3.5 मीटर रुंदीचा पूल उभारण्यात आला.  पूल वाहून गेल्यामुळे सोमवारपासून मलपे बीच आणि सँट मेरीज् आयलँडवरील जलक्रीडा रद्द करण्यात आले आहे. 

मलपे बीचवर मोठ्या प्रमाणात पर्यटन - 

मलपे बीचवर मोठ्या प्रमाणात जलक्रीडेचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक येतात. त्याचबरोबर फ्लोटिंग पुलामुळे पर्यटनाला अधिक चालना मिळेल असं कर्नाटक सरकारने माहिती दिली होती. मात्र पूल वाहून गेल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झालंय.