मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरू आहे. अद्याप कोणत्याही जागेचा निकाल हाती आला नाही. पण, सत्ताधारी काँग्रेसला पाठिमागे टाकत भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. मुसंडीचा आकडा इतका मोठा आहे की, भाजपची ही कामगिरी कायम राहिल्यास भाजप पूर्ण बहूमताने सत्तेत येण्याकडे वाटचाल करू शकतो. दरम्यान, भाजपला आघाडी मिळत असल्याचे पाहून विविध क्षेत्रात त्याचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. या क्षेत्रांपैकी एक म्हणजे शेअर मार्केट. शेअर बाजारात भाजपच्या आघाडीनंतर मोठी वाढ पहायला मिळत आहे. ताज्या माहितीनुसार शेअर बाजार २५० अंकांनी वधारला. तर, निफ्टीतही वाढ झाल्याचे पहायला मिळाले आहे.
हाती आलेला कल पाहता भाजपने १०७ तर, काँग्रेसने ६७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर, दुसऱ्या बाजूला जेडीएसनेही आपली कमगिरी सुधारली असून, जेडीएस सध्या ४२ जागांवर इतर उमेदवार २ जागांवर आघाडीवर आहे. एकूण २२२ मतदारसंघापैकी जवळपास सर्व मतदारसंघातील कल हाती आले आहेत. त्यानुसार मतदारसंघातील कल पाहता भाजपने जोरदार बाजी मारली आहे.
दरम्यान, आजच्या निकालाचे ताजे अपडेट आपणही जाणून घेऊ शकता. निकालाचे ताजे अपडेट आपल्याला http://zeenews.india.com/marathi/live पाहता येतील. तसेच, भारतीय निवडणूक आयोगाची अधिकृत वेबसाईट election commission of india ला सुद्धा आपण भेट देऊ शकता.