कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले...

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता भाजपने काँग्रेसला टार्गेट करण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसने बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून मोदी यांनी 'बजरंगबली की जय' अशी घोषणा केली आहे.

सुरेंद्र गांगण | Updated: May 3, 2023, 03:36 PM IST
कर्नाटक निवडणुकीत बजरंगबलीची एन्ट्री; मोदी यांनी दिली घोषणा, काँग्रेसबद्दल बोलले... title=

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आता अधिक जोश भरताना दिसून येत आहे. आता या निवडणुकीत बजरंगबली हनुमानाची एन्ट्री झाली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकमध्ये आयोजित केलेल्या निवडणूक रॅलीत 'भारत माता की जय आणि बजरंगबली की जय'ची घोषणा दिली. त्यामुळे यापुढे आता भाजपच्या प्रत्येक निवडणूक रॅलीत हेच नारे ऐकायला मिळतील, असे बोलले जात आहे. दरम्यान, काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याचे आश्वासन दिले आहे. यावर भारतीय जनता पक्षाने हा बजरंगबली हनुमानाचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसच्या या आश्वासनाला विरोध करत भाजपने हनुमानावर बंदी घालण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.

काँग्रेसने जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि...

काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर केला. यात म्हटले आहे की, 'कायदा आणि राज्यघटना पवित्र आहेत, असा आमचा विश्वास आहे. बजरंग दल, पीएफआय आणि इतर संघटनांसारखी द्वेष आणि शत्रुता पसरवणारी कोणतीही व्यक्ती किंवा संघटना, मग ती बहुसंख्य असो की अल्पसंख्याक, कायद्याचे उल्लंघन करु शकत नाही. संविधान अशा संघटनांवर कायद्यानुसार बंदी घालण्यास समर्थ आहे. काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात बजरंगदलवर बंदीची घोषणा केल्यानंतर भाजपने आता बजरंग म्हणजे बजरंगबली असे म्हटलेय. मोदींनी 'बजरंगबली की जय' असे म्हणत निवडणुकीला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केलाय.

काँग्रेसवर हल्लाबोल

मोदी प्रचार रॅली म्हणाले, काँग्रेसचा इतिहास दहशतवाद आणि दहशतवाद्यांना शांत करण्याचा राहिला आहे.  'शांतता आणि सौहार्दाचा संदेश देणाऱ्या सर्व मठ, तीर्थंकर आणि संतांना मी आदरांजली वाहतो. 'सबका साथ आणि सबका विकास' या मंत्राने आज आपण पुढे जात आहोत, याला सर्व संतांची प्रेरणा आहे. जनता-जनार्दनचा आदेश माझ्या डोक्यावर आहे. शेवटी, या देशातील 140 कोटी जनता आपला रिमोट कंट्रोल आहे. 10 मे हा मतदानाचा दिवस आहे. कर्नाटकला नंबर-1 करण्याचा भाजपचा संकल्प आहे. भाजपचा दावा आहे की, कर्नाटकात आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करणे. कर्नाटकला उत्पादन क्षेत्रात महासत्ता बनवण्याचा भाजपचा संकल्प आहे. हा आमचा रोड मॅप आहे तर काँग्रेसला तुमचे मत हवे आहे कारण त्यांना भाजपच्या योजना, येथील जनतेच्या विकासासाठी केलेली कामे नको आहेत, असे मोदी म्हणाले.

मोदींची भावनिक साद

कर्नाटक औद्योगिक विकासात एक नंबर व्हावा. तसा आमचा प्रयत्न आहे. कर्नाटक आरोग्य आणि शिक्षणातही अव्वल झाले पाहिजे, हे आमचे ध्येय आहे. काँग्रेसला काय हवंय? काँग्रेसला कर्नाटकला दिल्लीत बसलेल्या त्यांच्या राजघराण्याचं नंबर वन एटीएम बनवायचं आहे. जे लोक आयुष्यात पहिल्यांदाच मतदान करणार आहेत, तेच कर्नाटकचे भवितव्य ठरवणार आहेत. पहिल्यांदा मतदान करणार असलेल्या माझ्या मुला-मुलींनो, तुम्हाला तुमची कारकीर्द घडवायची असेल, तुमची कामे व्हायला पाहिजे असतील, तर काँग्रेसला ते शक्य होणार नाही. कर्नाटकात अस्थिरता असेल तर तुमचे नशीबही अस्थिर असेल, अशी भावनिक साद मोदी यांनी मतदारांना घातली.