कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारपुढे संख्याबळाचे आव्हान

विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस- जेडीएस आघाडी सरकारचे भवितव्य अधांतरी आहे.  

ANI | Updated: Jul 18, 2019, 09:10 AM IST
कर्नाटक सत्ता संघर्ष : कुमारस्वामी सरकारपुढे संख्याबळाचे आव्हान title=
Pic Courtesy: ANI

बंगळुरु : विश्वासदर्शक ठरावापूर्वी कर्नाटकमधील काँग्रेस- धर्मनिरपेक्ष जनता दल आघाडी सरकारचे भवितव्य अधांतरी आहे. मुख्यमंत्री कुमारस्वारी यांच्यापुढे संख्याबळ जमविण्याचे मोठे संकट आहे. कारण बंडखोर आमदारांना विश्वासदर्शक ठरावाला उपस्थित राहणे बंधनकारक करता येणार नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने काल दिलाय. त्यामुळे आजच्या विश्वासदर्शक ठरावाकडे लक्ष लागले आहे. सरकार राहणार की जाणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

आज विश्वासदर्शक ठरावावेळी सत्तारूढ आघाडीपुढे पुरेसे संख्याबळ जमविणे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यापुढे आव्हानात्मक आहे. काँग्रेसच्या १३ तर धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तीन आमदारांनी राजीनामे दिले आहेत. तर दोन अपक्ष आमदारांनी सत्तारूढ आघाडीचा पाठिंबा मागे घेत भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी आघाडीत अस्वस्थता आहे. जर १६ आमदारांचे राजीनामे स्वीकारले तर सत्तारूढ आघाडीचे बळ १०१ पर्यंत खाली येऊन कुमारस्वामी सरकार अल्पमतात येईल.