कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती

Karnataka CM Swearing in Ceremony :  कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळवला. एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20  जण मंत्रीपदाची आज शपथ घेणार आहेत.

सुरेंद्र गांगण | Updated: May 20, 2023, 07:54 AM IST
कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी, यांची खास उपस्थिती   title=

Karnataka CM Swearing in Ceremony : कर्नाटकात आज सिद्धरामय्या सरकारचा शपथविधी होणार आहे. सिद्धरामय्या (Siddaramaiah) मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार (DK Shivakumar) हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता बंगळुरुमध्ये कर्नाटकमधील नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. यावेळी 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतील. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. तसेच सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत.

135 जागा मिळवून काँग्रेसचा दणदणीत विजय

कर्नाटकात 224 जागांच्या विधानसभेत काँग्रेसने 135 जागा मिळवून दणदणीत विजय मिळल्यानंतर एका आठवड्यानंतर नवे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्यासह 20  जण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी अनेक समविचारी विरोधी पक्षांना निमंत्रण दिले आहे. तसेच त्यांना वैयक्तिकरित्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले. कर्नाटक काँग्रेसने काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी - वाड्रा यांनाही निमंत्रण दिले आहे. तसेच शिवकुमार यांनी भाजप आणि जेडी(एस) पक्षाच्या नेत्यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे, त्यांनी सांगितले की लोकप्रतिनिधी म्हणून ते देखील सरकारी यंत्रणेचा भाग आहेत.

अनेक दिवसांच्या राजकीय घडामोडीनंतर आणि मुख्यमंत्री कोण होणार याच्या जोरदार चर्चेनंतर हा सरकारचा शपतविधी सोहळा होत आहे. काँग्रेसने सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री तर शिवकुमार यांना उपमुख्यमंत्री म्हणून मान्यता दिली आहे. 75 वर्षीय सिद्धरामय्या हे मागासवर्गीय नेते असून त्यांचा पाच दशकांहून अधिक काळ राजकीय अनुभव आहे. तर कर्नाटक काँग्रेस प्रदेशचे अध्यक्ष डीके शिवकुमार, हे वोक्कलिंगा समुदायाचे आहेत, त्यांना काँग्रेसचे तारहाण आणि सत्ता मिळवणारे शिल्पकार म्हणून पाहिले जाते. त्यांच्यामुळे कर्नाटकात काँग्रेसने विजय मिळवलाय असे सांगितले जात आहे.

दिल्लीत बंद दाराआड बैठकीत तोडगा

प्रभारी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्यासह  सिद्धरामय्या आणि शिवकुमार या दोन्ही नेत्यांनी शुक्रवारी राष्ट्रीय राजधानीत मंत्रिमंडळ स्थापनेबाबत अनेक बैठका घेतल्या. सिद्धरामय्या यांनी एआयसीसीचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि सुरजेवाला यांच्यासोबत बंद दाराआड बैठक घेतली. नंतर नवीन मंत्रिमंडळात संभाव्य नावांच्या चर्चेत डीके शिवकुमार त्यांच्यासोबत सहभागी झालेत. शुक्रवारी तासभर चर्चेनंतर सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी सुरेजवाला आणि वेणुगोपाल यांच्यासह 10, जनपथ येथे राहुल गांधी यांची भेट घेतली, जिथे नेत्यांनी दीड तासांहून अधिक वेळ चर्चा केली. सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना शपथविधी सोहळ्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले.

यांना मिळणार मंत्रिमंडळात स्थान

काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खर्गे, माजी केंद्रीय मंत्री केएच मुनियप्पा यांच्या कन्या रूपा शशिधर, कर्नाटक काँग्रेसच्या कार्याध्यक्षा ईश्वरा खांद्रे, माजी मंत्री तन्वीर सैत, ज्येष्ठ नेते कृष्णा बायरे गौडा आणि कर्नाटक विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते बी.के. हरिप्रसाद यांची नावे मंत्री पदासाठी सुचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, नवीन मंत्रिमंडळात राज्याच्या सर्व विभागांचे आणि एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, महिला, तरुण आणि लिंगायत आणि दक्षिणेकडील दोन प्रमुख समुदायांसह वोक्कालिगास या विभागांचे प्रतिनिधित्व असेल, असे सांगितले जात आहे.