शिलाँग : मेघालयचे माजी आमदार ज्युलियस डोरफांग (Julius Dorphang) यांना अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी री-भोई जिल्ह्यातील एका विशेष न्यायालयाने 25 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ज्युलियस डॉरफांग आमदार असतानाची ही घटना आहे. विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती (POCSO) फॅब्रोनियस सिल्कम संगमा यांनी डोरफांगला 15 लाख रुपयांचा दंडही ठोठावला. डॉरफांग हे HNLC या अतिरेकी गटाचे संस्थापक अध्यक्षही आहेत.
इतर तीन लोकांना शिक्षाही
माजी आमदार ज्युलियस डोरफांग यांनी 2007 मध्ये HNLC चे अध्यक्ष म्हणून शरणागती पत्करली आणि 2013 मध्ये मावाठी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक जिंकली. कोर्टाने 13 ऑगस्ट रोजी डोरफांग यांना दोषी ठरवले आणि मंगळवारी शिक्षा सुनावली. न्यायालयाने आणखी तीन जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये दंडही ठोठावला.
डेरिशा मैरी खारबामोन, मामोनी परवीन आणि तिचा पती संदीप बिस्व यांच्यावर मुलीवर अत्याचार आणि वेश्याव्यवसायात ढकलण्याचा आरोप होता.
डोरफांगचे वकील किशोर सी. गौतम म्हणाले की, ते मेघालय उच्च न्यायालयात या आदेशाविरोधात जाणार आहेत. राज्य हक्क संरक्षण आयोगाने (एससीपीसीआर) दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे पूर्व खासी हिल्स जिल्हा पोलिसांनी डिसेंबर 2016 मध्ये डोरफांगला अटक केली होती. जानेवारी 2017 मध्ये, एससीपीसीआरने री-भोई येथे आणखी एक तक्रार दाखल केली होती, ज्यामध्ये डोरफांगने जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारींच्या आधारे, डोरफांगविरुद्ध दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यानंतर तो बेपत्ता झाला.
दुसऱ्या प्रकरणात सुनावणी सुरू
डोरफांगला 7 जानेवारी रोजी शेजारच्या आसाम राज्यातील एका बस टर्मिनलवरून अटक करण्यात आली. 5 जानेवारी 2017 रोजी दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणात त्याला पॉक्सो न्यायालयाने दोषी ठरवले होते. दुसऱ्या प्रकरणाची सुनावणी जोवाई येथील विशेष न्यायालयात सुरू आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळण्यापूर्वी डोरफांग नोंगपोह जिल्हा कारागृहात होता. गेल्या वर्षी त्याला वैद्यकीय आधारावर जामीन मिळाला होता. 13 ऑगस्ट रोजी माजी आमदाराला पुन्हा अटक करण्यात आली.