नवी दिल्ली: केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (UPSC)घेण्यात आलेल्या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (IES) परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर अखेर केंद्रीय मनुष्यबळ खात्याला जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) ही अग्रगण्य शिक्षणसंस्था असल्याचा साक्षात्कार झाला आहे. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस (IES) परीक्षेचे निकाल नुकतेच जाहीर झाले होते. एकूण ३२ जागांसाठी घेण्यात आलेल्या य परीक्षेत 'जेएनयू'च्या १८ विद्यार्थ्यांची निवड झाली होती.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जेएनयू विद्यापीठाचे कौतुक केले. IES सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत 'जेएनयू'चे १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. जेएनयू ही संशोधन आणि शिक्षणाच्याबाबतीत अग्रगण्य संस्थांपैकी एक आहे, हे आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत, असे रमेश पोखरियाल निशंक यांनी म्हटले.
दरम्यान, IES आणि ISSच्या उमेदवारांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत. या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची खातरजमा झाल्यानंतरच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात येईल. 'जेएनयू'चा अंशुमन कमलिया IESच्या परीक्षेत अव्वल गुणांनी उत्तीर्ण झाला. ओडिसाच्या अंशुमनने 'जेएनयू'मधून M.Phil चा अभ्यासक्रम पूर्ण केला होता.
काही दिवसांपूर्वी 'जेएनयू'मध्ये गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांवर हल्ला केला होता. यानंतर 'जेएनयू'मधील वातावरण प्रचंड तापले आहे. यादरम्यान अनेकांनी 'जेएनयू'मधील विद्यार्थ्यांच्या पात्रतेविषयी शंका उपस्थित केल्या होत्या. मात्र, इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिस परीक्षेच्या निकालांनी या टीकाकारांना चांगलीच चपराक बसली आहे.