प्रियकराला भेटायला पती ठरत होता अडसर; पत्नीने शेवटी कट रचला अन्...

Jharkhand Crime : झारखंडमध्ये कामावरुन परतणाऱ्या एका पोलीस हवालादाराची डोक्यात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. शुक्रवारी रात्री निर्जन अशा एका खाणीच्या शेजारी पोलीस कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली होती. या हत्यनेतर गावकऱ्यांनी पोलीस ठाण्याला घेराव घालत आरोपींना अटक करण्याची मागणी केली होती.

आकाश नेटके | Updated: Jun 25, 2023, 01:17 PM IST
प्रियकराला भेटायला पती ठरत होता अडसर; पत्नीने शेवटी कट रचला अन्...  title=

Crime News : झारखंडच्या (Jharkhand Crime) रामगड जिल्ह्यातील भुरकुंडा ओपी परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिसाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेबाबत ग्रामस्थांनी शनिवारी पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. त्यानंतर झारखंड पोलिसांनी याप्रकरणाचा तपास करण्यासाठी एक समिती देखील नेमली होती. मात्र आता याप्रकरणात महत्त्वाचा खुलासा झाला आहे. दोन महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या हवालदाराच्या हत्येसाठी कुटुंबियांनी त्याच्या पत्नीलाच जबाबदार धरलं आहे. पोलीस तपासातही पत्नीनेच प्रियकराच्या मदतीने पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी रात्री आरोपी पत्नीने प्रियकराच्या मदतीने घरी येत असताना पोलीस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी (Jharkhand Police) या प्रकरणी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

भुरकुंडा ओपी परिसरात असलेल्या एका खाणीजवळ शुक्रवारी रात्री 10.45 च्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबल पंकज कुमार दास यांची हत्या करण्यात आली होती. पंकज कुमार त्यांचे संपवून त्यांच्या घरी परतत होते. त्याचवेळी पंकजवर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर रात्री उशिरा या घटनेची माहिती मिळताच भुरकुंडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना घटनास्थळी पंकज दास रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. पोलिसांनी तात्काळ त्याला उपचारासाठी रामगड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. आरोपीने पंकजच्या डोक्यात चार गोळ्या घातल्या होत्या.

या सर्व प्रकारानंतर गावकऱ्यांनी भुरकुंडा पोलीस ठाण्याला घेराव घालत कारवाई करण्याची मागणी केली. संतप्त लोकांनी पोलीस ठाणे गाठून हत्येमध्ये सहभागी असलेल्यांना जनतेच्या ताब्यात देण्याची मागणी केली. त्यानंतर पंकड दासच्या कुटुंबियांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. दास कुटुंबियांनी पंकजची पत्नी नयना कुमारी आणि तिच्या प्रियकराला मुलाच्या हत्येसाठी जबाबदार धरलं होतं. त्यानंतर पोलिसांनी  नयना कुमारी हिला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावलं आणि तिच्याकडे चौकशी सुरु केली. चौकशीदरम्यान नयना कुमारीने तिचा प्रियकर मोनू पासवान उर्फ ​​मनोहर कुमार याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याची कबुली दिली आणि आपल्या पतीची त्याच्याकडून हत्या करवून घेतल्याची कबुली दिली. नयना कुमारीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मोनू पासवानला अटक केली. यासोबतच हत्येसाठी वापरलेले हत्यारही जप्त करण्यात आले आहे.

नयनाचे मोनू पासवानसोबत गेल्या अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र मे महिन्यात नयनाचे पंकजशी लग्न झाले. लग्न झाल्यानंतर पंकज हा नयना आणि तिचा प्रियकर यांच्यात अडथळा ठरत होता. पंकजमुळे नयनाला मोनू पासवानला भेटता येत नव्हते. त्यामुळे दोघांनी मिळून पंकजचा काटा काढण्याचे ठरवले आणि त्याच्या हत्येचा कट रचला. शुक्रवारी रात्री पंकज भुरकुंडा ओपी परिसरात असलेल्या खाणीजवळ जात होता. त्याचवेळी निर्जन असलेल्या रस्त्यावरच मोनू पासवानाने पंकजच्या डोक्यात चार गोळ्या मारल्या. या हल्ल्यामध्ये पंकजचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यना, पंकज दास याचा नयनासोबत 3 मे रोजीच विवाह झाला. त्यांच्या लग्नाला अगदी दोन महिने झाले होते. मात्र लग्नापासूनच पंकज आणि नयना यांच्यात  घरात नेहमी भांडणे व वाद होत होते. नयनाच्या प्रियकरावरुनच ही भांडणे होत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली होती.