जेट एअरवेज बोइंगमधून हटवणार फर्स्ट क्लासच्या सीट्स

जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्याचं ठरवलंय.

Updated: Nov 23, 2017, 05:32 PM IST
जेट एअरवेज बोइंगमधून हटवणार फर्स्ट क्लासच्या सीट्स title=

नवी दिल्ली : जेट एअरवेजने मोठ्या प्रमाणात खर्चात कपात करण्याचं ठरवलंय.
याचाच भाग म्हणून बोइंग ७७७ विमानांमधून फर्स्ट क्लासच्या सीट्स काढल्या जाणार आहेत असं जेट एअरवेजच्या वरिष्ठांनी सांगितलं. यामुळं विमानांमधल्या सीट्सची संख्या वाढवता येणार आहे.

नफा वाढवण्याचा प्रयत्न

व्यवसायवृद्धीसाठी कंपनीने काही योजना आखल्या आहेत. त्यात खर्च कपातीवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे, अशी माहिती गुंतवणूकदारांना देण्यात आली. जेट एअरवेज बोइंग ७७७ विमानांमधून फर्स्ट क्लासच्या सीट्स काढून विमानांमधल्या सीट्सची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे. सध्या जेट एअरवेजकडे १० बोइंग ७७७ विमानं आहेत. या विमानांमध्ये ८ फर्स्ट क्लास, ३० बिझनेस क्लास आणि ३०८ इकॉनॉमी क्लासच्या सीट्स आहेत. 

११० विमानांचा ताफा

फर्स्ट क्लासच्या सीट्स काढून विमानांतील सीट्सची संख्या ४०० पर्यंत नेण्याची जेट एअरवेजची योजना आहे. महसूलात वाढ करण्यासाठी हे पाउल उचललं जाणार आहे. उत्पन्नात २५० कोटींची वाढ करण्याचं उद्दीष्टं ठेवण्यात आलं आहे. जेटकडे ११० विमानांचा ताफा आहे.

एअरलाइन कंपन्यांसमोरील आव्हान

विमान कंपन्यांमध्ये सध्या प्रचंड स्पर्धा असून वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न केला जातोय. या क्षेत्राला मंदीचाही सामना करावा लागतोय.