Letter Bomb On Kejriwal: फसवणुकीच्या प्रकरणामध्ये सध्या दिल्लीतील मंडोली तुरुंगामध्ये कैद असलेल्या सुकेश चंद्रशेखरने (Jailed conman Sukesh Chandrasekhar) आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. केजरीवाल यांना आपण 75 कोटी (Rs 75 cr) रुपये दिल्याचा दावा सुकेशने केला आहे. सुकेशने एका पत्रामधून (letter bomb) हा खळबळजनक दावा केला आहे. 2020 मध्ये तेलंगण राष्ट्र समितीच्या ऑफिसमध्ये (TRS office) आपण केजरीवाल यांच्यासाठी 75 कोटी रुपये पाठवल्याचं सुकेशचं म्हणणं आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांच्या मी संपर्कात होतो. व्हॉट्सअप आणि टेलीग्रामवर आमचं बोलणं व्हायचं, असंही सुकेशने म्हटलं आहे. केजरीवाल यांच्याबरोबर झालेल्या या चर्चेचे पुरावे म्हणून आपल्याकडे 700 पानांचे डिजीटल पुरावे आहेत, असंही सुकेश म्हणाला आहे.
सुकेशने मागील काही काळापासून सातत्याने अशाप्रकारचे मोठे दावे केले आहेत. मात्र या दाव्यांसंदर्भातील कोणतेही पुरावे सापडलेले नाहीत. सुकेशने सध्या केजरीवाल यांच्याविरोधात अधिवक्ता अनंत मलिक यांच्या माध्यमातून पत्र जारी केलं आहे. "केजरीवालजी, मी 2020 मधील एका चॅटचा ट्रेलर जारी करणार आहे. यामध्ये तुम्ही आणि मिस्टर जैन (सध्या तुरुंगात असलेले दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन) यांनी 15 किलो तूप हा कोट्यावधीच्या व्यवहारांसाठी वापरलेला कोडवर्ड आहे. मी स्वत: ही गोष्ट तुम्हाला पाठवली होती. म्हणजेच तुमच्या माध्यमातून टीआरएस पक्षाच्या कार्यालयामध्ये एका आरोपीला 15 कोटी रुपये दिले होते," असं सुकेशने पत्रात म्हटलं आहे. तुम्ही सांगितल्यानेच आपण ही 15 कोटींची लाच दिली होती असंही सुकेशने या पत्रात म्हटलं आहे.
या पत्रामध्ये केजरीवाल यांनी हे 15 कोटी रुपये हैदराबादमध्येच सोडून द्यावेत असंही म्हटल्याचा दावा सुकेशने केला आहे. एकूण 5 प्रकरण आहेत. त्यामुळे 15 X 5 किलो तूप (75 कोटी रुपये) हैदराबादमध्येच आहेत, असं ते म्हणाल्याचा दावा या पत्रात सुकेशनं केला आहे. हैदराबादमधील टीआरएसच्या ऑफिसमध्ये उभ्या असलेल्या रेंज रोव्हर गाडीमधील एपी नावाच्या व्यक्तीला 15 किलो तूप (15 कोटी रुपये) देण्यास सांगितलं होतं.
सुकेशने केजरीवाल यांच्यासंदर्भात पहिल्यांदाच असा काही दावा केलाय असं नाही. यापूर्वी कोर्टामध्ये सुकेशला हजर करण्यात आलं होतं त्यावेळीही त्याने केजरीवाल यांचा उलटा प्रवास सुरु झाला असून लवकरच त्यांचे तिहार क्लबमध्ये (तिहार जेलमध्ये) स्वागत करावं लागणार आहे. तसेच मागील आठवड्यातच सुकेशने आपण केजरीवाल यांच्याविरोधात एक मोठा खुलासा करणार असल्याचं म्हटलं होतं. सध्या त्याने लिहिलेलं हे पत्र आणि त्यात केलेले हे आरोप हाच हा मोठा खुलासा असल्याचं सांगितलं जातं आहे.