'लायकी नसलेल्या व्यक्तीला...', ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर पहिला आक्षेप, हिमांगी सखी माँ म्हणाल्या 'ड्रग्ज केसमध्ये जेलमध्ये...'

महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून ममता कुलकर्णीची नियुक्ती झाल्याबद्दल जगद्तगुरू महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी भाष्य केलं आहे  

शिवराज यादव | Updated: Jan 25, 2025, 04:28 PM IST
'लायकी नसलेल्या व्यक्तीला...', ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर पहिला आक्षेप, हिमांगी सखी माँ म्हणाल्या 'ड्रग्ज केसमध्ये जेलमध्ये...' title=

महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर म्हणून बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीची नियुक्ती करण्यात आल्यानंतर ट्रान्सजेंडर कथावाचक जगद्गुरू हिमांगी सखी माँ यांनी त्यावर भाष्य केलं आहे. हिमांगी सखी यांनी ममता कुलकर्णीच्या भूतकाळातील वादांचा हवाला देत या नियुक्तीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ANI शी संवाद साधताना त्यांनी ममता कुलकर्णीच्या नियुक्तीवर नाराजी जाहीर केली. 

"किन्नर आखाड्याने फक्त प्रसिद्धीसाठी ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर केलं आहे. समाजाला तिचा भूतकाळ चांगलाच माहिती आहे. तिला ड्रग्ज प्रकरणात जेलमध्येही जावं लागलं होतं. आता अचानक ती भारतात येते, महाकुंभमध्ये सहभागी होते आणि महामंडलेश्वर पद दिलं जातं. याची चौकशी व्हायला हवी," असं हिमांगी सखी माँ यांनी एएनआयशी संवाद साधताना सांगितलं. 

किन्नर आखाडाच का निवडला? महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णीने केला खुलासा, म्हणाली 'मी 23 वर्षांपूर्वी...'

 

"अशा व्यक्तीला महामंडलेश्वर पद देऊन तुम्हाला नेमका कोणता गुरु सनातन धर्माला द्यायचा आहे? हा नैतिकतेचा प्रश्न आहे. ज्याची गुरु होण्याची लायकी नाही अशा व्यक्तीला गुरु केलं जात आहे," असाही आक्षेप त्यांनी नोंदवला. 

ममता कुलकर्णीने शुक्रवारी प्रयागराजमधील संघम घाटावर 'पिंडदान' केलं. "हा महादेव, महाकाली यांचा आदेश होता. हा माझ्या गुरूंचा आदेश होता. त्यांनी हा दिवस निवडला. मी काहीही केले नाही," असं यावेळी ती म्हणाली. त्याच दिवशी, किन्नर आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण यांनी घोषणा केली की ममता कुलकर्णीने महामंडलेश्वर म्हणून आध्यात्मिक भूमिका साकारली आहे.

"किन्नर आखाडा ममता कुलकर्णी (माजी बॉलीवूड अभिनेत्री) यांना महामंडलेश्वर बनवणार आहे. त्यांचे नाव श्री यमाई ममता नंदगिरी असं ठेवण्यात आले आहे. मी येथे बोलत असताना, सर्व विधी सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून ती किन्नर आखाड्याशी आणि माझ्या संपर्कात आहे. तिला हवे असल्यास कोणत्याही आध्यात्मिक पात्र साकारण्याची परवानगी आहे. कारण आम्ही कोणालाही त्यांची कला सादर करण्यास मनाई करत नाही," असं लक्ष्मी नारायण म्हणाल्या.

ममता कुलकर्णीने 19990 च्या दशकात 'करण अर्जुन' आणि 'बाजी' सारख्या हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आपल्या कारकिर्दीत शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान सारख्या आघाडीच्या अभिनेत्यांसोबत ती झळकली. 2000 च्या सुरुवातीला ममता बॉलिवूडपासून दूर गेली आणि परदेशात स्थायिक होत प्रसिद्धीपासून लांब गेली.