येस बँकेत जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये अडकले

येस बँकेत अडकल्यामुळे पुजारी आणि भक्त चिंतेत आहेत. 

Updated: Mar 7, 2020, 10:15 AM IST
येस बँकेत जगन्नाथ मंदिराचे ५९२ कोटी रुपये अडकले title=

भुवनेश्वर : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) गुरुवारी येस बँकेवर निर्बंध लादले. या निर्बंधांमुळे येस बँकेच्या ग्राहकांना मोठा झटका बसला आहे.  ग्राहकांना येस बँकेच्या अकाऊंटमधून केवळ ५० हजार रुपयेच काढता येणार आहेत. त्यामुळे ग्राहक मोठ्या संकटात सापडले आहेत. सूत्रांनी सांगितल्यानुसार येस बँकेत जगन्नाथ मंदिराचे ५९५ कोटी रुपये अडकले आहेत. त्यामध्ये ५४५ कोटी रूपये फिक्स डिपॉझीटमध्ये तर ४७ कोटी रूपये फ्लेक्सी डिपॉझीटमध्ये अडकले आहेत. 

मंदिराची अत्यंत मोठी रक्कम येस बँकेत अडकल्यामुळे पुजारी आणि भक्त चिंतेत आहेत. शुक्रवारी ओडिशा सरकारच्या नेत्यांनी मंदिरासंबंधीत बातमी दिली. त्यानंतर विरोधी पक्षातील नेतेमंडळींनी यासंदर्भात ओडिशा सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे. 

'मंदिर प्रशासनाने त्वरित पैसे वसूल केले पाहिजेत. असं वक्तव्य पुरीचे माजी आमदार महेश्वर मोहंती यांनी यावेळेस केलं. याप्रकरणी विरोधी नेत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. 'जगन्नाथ मंदिराच्या पैश्यांसोबत खेळणं तात्काळ थांबवा. जर मंदिराच्या पैश्यांना काही झालं तर मुख्यमंत्री नवीन बाबू तुम्ही होणाऱ्या आंदोलनाला सामोरे जावू शकत नाही.' असा इशारा काँग्रेसच्या नेत्यांनी दिला. 

यावर काळजी करण्याचे कारण नाही असं वक्तव्य कायदा मंत्री प्रताप जेना यांनी केलं. 'मंदिराच्या पैश्यांना कोणत्याही प्रकारचा धक्का लागणार नाही. आमचं मंदिराचे प्रशासन आणि विश्वस्थांसोबत बोलणं झालं आहे. येस बँकेतील ठेवी एका राष्ट्रीयकृत बँकेत हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.' असं ते म्हणाले.