इन्फोसिसचा बंपर धमाका; गुंतवणूकदारांना प्रति शेअर मिळणार 'इतके' रुपये

Infosys Dividend 2023 Announcement: चौथ्या तिमाहीच्या निकालांसोबतच आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसने (Infosys) अंतिम लाभांशही जाहीर केला आहे. बीसएईने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने 350 टक्के च्या लाभांशाची घोषणा केली आहे.

Updated: Apr 14, 2023, 12:33 PM IST
 इन्फोसिसचा बंपर धमाका; गुंतवणूकदारांना प्रति शेअर मिळणार 'इतके' रुपये title=
(फोटो सौजन्य - PTI)

निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : देशातली दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या इन्फोसिसच्या (Infosys Dividend Announcements) शेअर धारकांसाठी महत्वाची बातमी आहे. चौथ्या तिमाहीच्या निकालासोबत इन्फोसिसने  तब्बल 350 टक्के लाभांश घोषित केला आहे. कंपनीनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार पाच रुपये फेस व्हॅल्यू (Face Value) असणाऱ्या प्रत्येक शेअरमागे १७ रुपये लाभांश वितरीत करण्यात येणार आहे. यासाठी 2 जून रोजी तुमच्या डिमॅटमध्ये (demat) इन्फोसिसचे शेअर असणे गरजेचे आहे. 

कंपनीनं गेल्या आर्थिक वर्षात तीन वेळा लाभांश घोषित केला आहे. पहिला लाभांश मे महिन्यात 16 रुपये प्रति शेअर, दुसरा लाभांश 16 रुपये 50 पैसे प्रति शेअर ऑक्टोबर महिन्यात घोषित झाला होता. त्यामुळे सरलेल्या आर्थिक वर्षात (2022-23) इन्फिच्या समभाग धारकांना तब्बल एकूण 50 रुपये डिव्हिंड मिळाला आहे. कंपनीने गुरुवारी जारी केलेल्या घोषणेनंतर इन्फीचे डिव्हीडंट यील्ड 22 रुपयांवर पोहचली आहे.

लाभांश (डिव्हीडंट) म्हणजे काय?

समभाग धारकांना कंपन्या आपल्या नफ्याचा काही भाग प्रत्येक वर्षी वितरीत करतात. त्याला लाभांश (Dividend) असं म्हटलं जातं. प्रत्येक कंपनीला झालेला नफा समभाग धारकांमध्ये वितरीत करणे बंधनकारक नसते. पण चांगला नफा झाल्यास कंपनीचे व्यवस्थापन सामन्यपणे सगळ्याच समभाग धारकांना त्याचा लाभ देतात. याच प्रक्रियेला लाभांश वितरण (dividend distribution) असे म्हटलं जातं. लाभांश हा नेहमी समभागाच्या दर्शनी मूल्यावर (face value) वर ठरवला जातो. म्हणजे जर एखाद्या कंपनीच्या समभागाचे दर्शनी मूल्य 10 रुपये असेल आणि कंपनीने 100 टक्के लाभांश (डिव्हीडंट) घोषित केला, तर प्रत्येक समभाग धारकाला प्रति समभाग 10 रुपये वितरीत करण्यात येतात. याचा अर्थ एखाद्या व्यक्तीकडे एखाद्या कंपनीचे 10 समभाग असतील, आणि कंपनीने 10 रुपये लाभांशाची घोषणा केली, तर त्याला एकूण 100 रुपये लाभांश मिळतो. ही रक्कम समभाग धारकाच्या खात्यात थेट जमा करण्यात येते.

डिव्हिडंट यील्ड म्हणजे काय?

आर्थिक वर्षाच्या अखेरीला प्रत्येक कंपनी किती लाभांश वितरीत करते यावर त्या कंपनीचे डिव्हीडंट यील्ड ठरते. सोप्या शब्दात सांगायचे तर एखाद्या गुंतवणूकदाराने एखाद्या कंपनीच्या समभागात 1000 रुपये गुंतवले, तर वर्षाअखेरीस जो एकूण लाभांश (डिव्हिडंट) मिळला, तो त्या कंपनीचा डिव्हिडिंट यील्ड समजला जातो. इन्फोसिसच्या बाबतीत गुरुवारच्या घोषणेनंतर सरलेल्या आर्थिक वर्षाचे डिव्हीडंट यील्ड सुमारे 22 रुपये नोंदवण्यात आले आहे.

इन्फोसिसच्या निकालातून बाजाराचा अपेक्षा भंग

गुरुवारी बाजार बंद झाल्यावर इन्फोसिसने सरलेल्या आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीचे निकाल घोषित केले. कंपनीला तिसऱ्या तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत चौथ्या तिमाहीत सुमारे सात टक्के घट आल्याचं निकालामध्ये स्पष्ट झालं आहे. कंपनीला जानेवारी 23 ते मार्च 23 याकाळात एकूण नफा 6 हजार 128 कोटी रुपये नोंदवण्यात आला आहे. नफ्याचे आकडे बाजाराच्या अपेक्षेपेक्षा कमी आल्याने कंपनीबद्दलची बाजाराची भावना फारशी उत्साह वर्धक राहिलेली नाही. अमेरिका आणि युरोपमधील अर्थव्यवस्थेत आलेल्या मंदीमुळे पुढील आर्थिक वर्षातही आयटी कंपन्यांचे नफ्याचे चित्र फारसे चांगले ठरणार नाही असं बाजारातील विश्लेषकांचं म्हणणं आहे. त्याचाच परिणाम म्हणून बुधवारी आणि गुरुवारी टीसीएस आणि इन्फोसिस या दोन्ही दिग्गज कंपन्यांच्या समभागांच्या किंमतीमध्ये लक्षणीय घट बघायला मिळाली. गुरुवारी बाजार बंद झाला त्यावेळी निकाल घोषित झालेले नसतानाही इन्फोसिसचा समभाग सुमारे 2.75 टक्के घसरुन बंद झाला. निकालामुळे झालेला अपेक्षाभंग बघता सोमवारी इन्फोसिसचा समभाग घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.