Nitish Kumar Scolds Farmer: बिहार सरकारने (Bihar Government) आयोजित केलेल्या चौथ्या 'कृषी रोडमॅप' सोहळ्याचं उद्घाटन मंगळवारी झालं. या कार्यक्रमामध्ये एक प्रगतशील शेतकरी आणि कृषी उद्योजक आपल्या वैयक्तिक प्रवासासंदर्भात बोलत होता. मंचावरील पोडियमवरुन समोर उपस्थित शेतकरी बांधवांशी संवाद साधणाऱ्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री नीतीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी मध्येच हटकलं. तुम्ही तुमच्या भाषणामध्ये फार मोठ्या प्रमाणात इंग्रजी शब्दांचा (English Words) वापर करत आहात असं सांगत मुख्यमंत्र्यांनी या शेतकऱ्याला फटकारलं. राजधानी पाटण्यातील बापू सभागृहामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये बोलणाऱ्या या शेतकऱ्याचं नाव अमित कुमार असं होतं. तो लखीसराय येथील शेतकरी आहे.
अमित कुमार यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचं कौतुक केलं. अमित कुमार यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुण्यामध्ये नोकरी केली. मात्र पुण्यातील सेटल आयुष्य सोडून ते आपल्या वडिलांच्या जिल्ह्यामध्ये मशरुमची शेती करण्यासाठी आले. हे भाषण सुरु असताना अचानक मुख्यमंत्र्यांनी या उद्योजकाला थांबवलं. "मला तुम्हाला हे विचारायचं आहे की एवढे सारे इंग्रजी शब्द तुम्ही भाषणात का वापरत आहात? हे इंग्लंड आहे का? तुम्ही बिहारमध्ये काम करता. शेतकरी सामान्य माणूस करतो. तुम्हाला हा सल्ला देण्यासाठी बोलवण्यात आलं आहे आणि तुम्ही इंग्रजीमध्ये बोलत आहात. हा भारत आहे आणि तुम्ही बिहारमध्ये आहात," असं नीतीश कुमार यांनी सांगितलं.
मातृभाषा वापरण्यावर जोर देताना समाजवादी नेते राम मनोहर लोहिया यांचे अनुयायी असलेल्या नीतीश कुमार यांनी आपली मतं मांडली. "करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनदरम्यान स्मार्टफोनचं व्यसन लागल्याने अनेकजण आपली मातृभाषा विसरले आहेत," असं नीतीश कुमार यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला. गोंधळून गेलेल्या अमित कुमार यांनी पुन्हा बोलायला सुरुवात केली आणि 'गव्हर्मेंट स्कीम' हा शब्द वापरला. हे शब्द ऐकताच मुख्यमंत्र्यांनी पुन्हा अमित यांना झापलं. "हे काय आहे? तुम्हाला सरकारी योजना म्हणता येत नाही का? मी एक प्रशिक्षित इंजिनियर आहे. माझं शिक्षण इंग्रजी माध्यमातून झालं आहे. मात्र शिक्षणासाठी भाषा वापरणं वेगली गोष्ट आहे. तुम्हाला तुमच्या दैनंदिन आयुष्यामध्ये असं का करावं लागतं?" असा प्रश्न मुख्यमंत्र्यांनी अमित यांना इंग्रजीच्या वापरावरुन विचारला.
#WATCH खेती आम आदमी करता है। आपको यहां सुझाव देने के लिए बुलाया गया है और आप अंग्रेजी बोल रहे हैं। क्या ये इंग्लैंड है? ये भारत है और ये बिहार है। कोरोना के कारण लोग मोबाइल पर देख कर अपनी भाषा को भूल रहे हैं:किसान समागम में किसान द्वारा अंग्रेजी बोलने पर बिहार CM नीतीश कुमार,पटना pic.twitter.com/7hKHm71jXp
— ANI_HindiNews (@AHindinews) February 21, 2023
लखीसरायच्या अमित यांनी 'सॉरी' म्हणत पुन्हा आपलं भाषण सुरु केलं. भारतीय जनता पार्टीने आपल्या माजी सहकारी पक्षाला म्हणजेच जनता दलाचे (युनायटेड) नेते नीतीश कुमार यांच्यावर या प्रकरणावरुन टीका केली आहे. बिहार भाजपाचे नेते आणि ओबीसी मोर्चाचे राष्ट्रीय महासचिव निखिल आनंद यांनी, "मुख्यमंत्री नीतीश कुमार इंग्रजी भाषा वापरण्यात आल्याने नाराज आहेत. वंचित वर्गातील लोकांनी इंग्रजी वापरल्याने ते नाराज झालेत का? सार्वजनिक भाषणामध्ये इंग्रजी शब्दांना त्यांनी केलेला विरोध हा फारच हस्यापद आहे," असा टोला लगावला.