नवी दिल्ली - तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कळघमचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती टीका केली. भारतीय जनता पक्षाशी आम्ही कधीच आघाडी करू शकणार नाही, असे स्पष्ट करून ते म्हणाले की, नरेंद्र मोदी स्वतःची तुलना माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयींशी करतात ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. त्यांच्या नेतृत्त्वाखाली कोणतीही आघाडी कार्यक्षमपणे काम करू शकत नाही. त्यामुळे आमचा पक्ष भाजपशी कधीच आघाडी करणार नाही.
तामिळनाडूतील जुन्या राजकीय पक्षांशी आघाडी करण्यासाठी भाजपचे दरवाजे उघडे असल्याचे वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केले होते. त्यापार्श्वभूमीवर स्टॅलिन यांनी आपली भूमिका मांडली आणि त्यांनी आघाडीचा प्रस्ताव थेटपणे फेटाळून लावला. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तामिळनाडूतील बूथस्तरावरील कार्यकर्त्यांशी मोदींनी संवाद साधला. माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या कार्यकाळात प्रादेशिक पक्षाशी आघाडी करून आघाडी सरकारचा आदर्श घालून दिला होता. प्रादेशिक पक्षांच्या आशा-आकांक्षांना अटलबिहारी वाजपेयी यांनी महत्त्व दिले आणि त्यांच्या मदतीने आघाडी सरकारचे मॉडेल २० वर्षांपूर्वी तयार केले. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मार्गावरूनच भाजपने आतापर्यंत मार्गक्रमण केले आहे.
भाजप लोकसभा निवडणुकीसाठी डीएमके किंवा एआयएडीएमके किंवा रजनीकांत प्रस्तावित पक्षापैकी एकाशी आघाडी करणार का, असा प्रश्न एका कार्यकर्त्याने मोदींना विचारला. त्याला उत्तर देताना मोदींनी आघाडी करण्याचे सुतोवाच केले होते. २०१४ मधील निवडणुकीत भाजपला एकहाती बहुमत मिळाले असूनही आम्ही आघाडीतील पक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन केली. त्यामुळे जुन्या राजकीय पक्षांसाठी भाजपचे दरवाजे कायम उघडे असतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपने एकूण सहा छोट्या राजकीय पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढविली होती. पण या आघाडीला तामिळनाडूतील ३९ पैकी फक्त दोन जागांवर यश मिळाले होते.