पी चिदंबरम यांच्या अटकेवर सुनावणी, पत्नी-मुलगा न्यायालयात हजर

पी चिदंबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत

Updated: Aug 23, 2019, 11:42 AM IST
पी चिदंबरम यांच्या अटकेवर सुनावणी, पत्नी-मुलगा न्यायालयात हजर  title=

नवी दिल्ली : 'आयएनएक्स मीडिया' गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले पी. चिदंबरम यांच्या अटकेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आजही सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या या याचिका सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणीसाठी येणार आहेत. यातली एक याचिका सीबीआय विरोधात तर दुसरी ईडी विरोधात आहे. न्यायमूर्ती बोपण्णा आणि न्यायमूर्ती बानूमती यांच्या खंडपीठापुढे या याचिका आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंगळवारी फेटाळला होता. त्यानंतर या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. 

सीबीआयनं चिंदबरम यांना ताब्यात घेतल्यानंतर एक याचिका अर्थहीन ठरली. परंतु, तरीदेखील हे प्रकरण सुनावणीसाठी न्यायालयात येईल, याचं कारण म्हणजे अद्याप ईडीनं चिदंबरम यांना अटक केलेली नाही. अशावेळी सुप्रीम कोर्टाकडून चिदंबरम यांना दिलासा मिळण्याची शक्यता फार कमी आहे. 

दरम्यान, या सुनावणीसाठी पी चिदंबरम यांची पत्नी नलिनी चिदंबरम आणि मुलगा कार्ति चिदंबरम सर्वोच्च न्यायालयात पोहचलेत. पी चिदंबरम यांच्यावतीनं ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल बाजू मांडणार आहेत. 

गुरुवारी रॉउज एवेन्यू कोर्टानं चिदंबरम यांना २६ ऑगस्टपर्यंत रिमांडमध्ये ठेवण्याचे आदेश दिलेत. सीबीआयकडून सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी चिदंबरम यांच्या अटकेची मागणी केली होती.