मुंबई: कर्जाच्या ओझाखाली बुडालेल्या एअर इंडिया या सरकारी विमानसेवेतून बाहेर पडण्याचा भाजप सरकारच्या प्रयत्नांना मोठा झटका बसलाय. ३१ मे पर्यंत एअर इंडियाचे मालकी हक्क विकत घेण्यासाठी एकही खरेदीदार पुढे आलेला नाही. टाटा, जेट एअरवेज, इंडिगो या तीन खाजगी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी सुरूवातीला एअर इंडियामध्ये मालकी हक्क विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण ३१ मे पूर्वी कुणीही अधिकृत बोली सादर केलेली नाही.
दरम्यान, या आधी बोली लावण्याची मुदत १४ मे निश्चित करण्यात आली होती. पण कुणीही खरेदीसाठी उत्सुक नसल्याचं पुढे आलं. त्यामुळे ही मुदत आणखी पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात आली. पण वाढीव मुदतीही एकही कंपनी पुढे आलेली नाही. सरकारनं एअर इंडियातील ७६% समभागांची विक्री करून मालकी हक्क सोडण्याचा निर्णय घेतला होता. एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येतंय.
दरम्यान, अहमदाबाद विमानतळाच्या रनवे वर स्पाईस जेटच्या विमानाचा टायर फुटला. मात्र सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रवाशांना घेऊन स्पाईस जेटचं विमान अहमदाबादहून बँकॉकला जात होतं. या अपघातामुळे विमानसेवेवर परिणाम झाला. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, लखनऊ आणि दुबईवरून येणाऱ्या जाणाऱ्या विमानसेवेवर याचा परिणाम झाला.