Whole Life Assurance : आपलं आयुष्य आणि कुटुंबाची भविष्यातील चिंता यामुळे विम्याचे महत्त्व अधोरेखित होतं. पण आपल्या देशात विमा घेण्याचं प्रमाण खूपच कमी आहे. विमा नियामक IRDAI च्या 2020-21 च्या वार्षिक अहवालानुसार, भारतात विम्याचा वाटा GDP च्या फक्त 4.2 टक्के आहे. जागतिक पातळीवर हे प्रमाण 7.4 टक्के आहे. विशेषत: ग्रामीण भारतात विमा घेण्याचं प्रमाण कमी आहे. हे लक्षात घेऊन 1995 साली ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स सुरू करण्यात आला. ग्रामीण भारतातील लोकांना विम्याच्या कक्षेत आणणे हा या मागचा उद्देश होता.
ग्रामीण पोस्टल लाइफ इन्शुरन्स (RPLI) अंतर्गत पोस्ट ऑफिसने सहा योजना सुरू केल्या आहेत. आज आपण यापैकी एका Whole Life Assurance बद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. या योजनेला ग्रामसुरक्षा असेही म्हणतात. इंडिया पोस्ट वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, या योजनेत व्यक्तीचा 80 वर्षे वयापर्यंत विमा उतरविला जातो. त्यानंतरही तो जिवंत राहिला तर त्याला त्याच्या परिपक्वतेचा लाभ मिळतो. यादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर नॉमिनीला मृत्यू लाभ मिळेल.
ही पॉलिसी घेण्यासाठी किमान वयोमर्यादा 19 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 55 वर्षे आहे. कमाल विमा रक्कम 10 लाख असू शकते. 4 वर्षांनंतर कर्जाची सुविधा मिळते. तीन वर्षांनी पॉलिसी सरेंडर करण्याची सुविधाही आहे. पॉलिसी पाच वर्षापूर्वी सरेंडर केल्यास बोनस मिळत नाही.
इंडिया पोस्ट मोबाईल अॅपवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पॉलिसीधारक 20 वर्षांचा असेल आणि त्याने होल लाइफ अॅश्युरन्ससाठी नोंदणी केली, तर 50 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी मासिक प्रीमियम 1672 रुपये असेल. 55 वर्षांसाठी मासिक प्रीमियम 1568 रुपये, 58 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी 1515 रुपये आणि 60 वर्षांच्या मॅच्युरिटीसाठी मासिक प्रीमियम 1463 रुपये असेल. समजा पॉलिसीधारकाने वयाच्या 60 व्या वर्षी पॉलिसी मॅच्योर करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला पुढील 40 वर्षांसाठी रु. 1463 चा मासिक प्रीमियम भरावा लागेल. दैनंदिन प्रीमियम सुमारे 50 रुपये असेल.
सध्या, या पॉलिसीसाठी वार्षिक बोनस 60 रुपये प्रति 1000 विमा रकमेवर आहे. अशा परिस्थितीत, 10 लाख विमा रकमेवर वार्षिक बोनस 60 हजार रुपये असेल. पुढील 40 वर्षांसाठी समान रीतीने बोनस मिळाल्यावर, एकूण बोनसची रक्कम 24 लाख रुपये होईल. मॅच्युरिटी रक्कम 34 लाख रुपये असेल ज्यामध्ये 10 लाखांच्या विमा रकमेचा समावेश असेल.