गुजरातमधल्या म्हशींचे पंतप्रधानांनी केलं जगासमोर कौतुक; जाणून घ्या काय आहे खासियत

पंतप्रधान मोदी यांनी जगभरातून आलेल्या पाहुण्यांसमोर या म्हशींचे कौतुक केलं

Updated: Sep 12, 2022, 04:30 PM IST
गुजरातमधल्या म्हशींचे पंतप्रधानांनी केलं जगासमोर कौतुक; जाणून घ्या काय आहे खासियत title=

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिटचे (International Dairy Federation World Dairy Summit) दिल्लीजवळील ग्रेटर नोएडा येथे उद्घाटन केले. पंतप्रधानांनी जगाला भारतातील दुग्ध व्यवसायाची खासियत सांगत देशातील पशुपालन संस्कृतीबाबत माहिती दिली.

पंतप्रधानांनी सांगितले की, "जगाच्या अन्य विकसित देशांपेक्षा भारतातील दुग्ध व्यवसायाची ताकद ही छोट्या प्रमाणात शेती करणारे शेतकरी आहेत. आज भारतात डेअरी सहकारी संस्थांचे इतके मोठे जाळे आहे, ज्याचे उदाहरण संपूर्ण जगात सापडणे कठीण आहे."

यावेळी पंतप्रधान मोदींनी जगभरातून आलेल्या पाहुण्यांसमोर गुजरातच्या कच्छमधील बन्नी म्हशीचे (banni buffalo) कौतुक करत त्याची माहिती दिली. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतातील दुग्धव्यवसाय क्षेत्राचे वैशिष्ट्य म्हणजे गायी आणि म्हशींच्या स्थानिक जाती, ज्या अत्यंत कठीण हवामानातही टिकून राहण्यासाठी ओळखल्या जातात. मी तुम्हाला गुजरातच्या बन्नी म्हशीचे उदाहरण देईन, जी कच्छच्या वाळवंटात आणि तेथील परिस्थितीमध्ये मिसळून गेली आहे आणि हे पाहून आश्चर्य वाटतं. दिवसा खूप उष्णता असते त्यामुळे ही बन्नी म्हैस रात्री चरायला बाहेर पडते."

"आमच्या परदेशातील मित्रांना देखील हे जाणून धक्का बसेल की त्यावेळी बन्नी म्हशीसोबत कोणीही शेतकरी नसतो. त्या म्हशी स्वतः गावाजवळ बांधलेल्या कुरणात जातात. वाळवंटात पाणी कमी असते त्यामुळे बन्नी म्हशींचे काम अगदी कमी पाण्यात होते. रात्री 10-15 किलोमीटर फिरूनही सकाशी म्हैस सकाळी स्वतःहून येते. कुणाची बन्नी म्हैस हरवली किंवा चुकीच्या घरी गेली असे क्वचितच ऐकायला मिळते," असेही मोदी म्हणाले.

 मी फक्त बन्नी म्हशीचे उदाहरण दिले आहे, परंतु भारतात मुर्रा, जाफ्राबादी, निली रवी, पंढरपुरी अशा अनेक जाती त्यांच्या पद्धतीने विकसित होत आहेत. त्याचप्रमाणे गायींमध्ये गीर गाय, सायवाल, राठी, कांकराटे, धारपारकर, हरियाणा अशा अनेक जाती आहेत ज्या भारताच्या दुग्धव्यवसाय क्षेत्राला अद्वितीय बनवतात. भारतीय जातीचे बहुतेक प्राणी हवामानाशी जुळवून घेतात, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.