नवी दिल्ली: मोदी सरकारकडून लवकरच आभासी चलन अर्थात क्रिप्टोकरन्सी संदर्भात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, मोदी सरकारकडून लवकरच क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली जाऊ शकते.
खासगी क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांमध्ये मोठा धोका आणि अनिश्चितता असते. त्यामुळे केंद्रातील मंत्रिगटाकडून क्रिप्टोकरन्सीवर बंदी घालण्याची शिफारस सरकारला करण्यात आली आहे.
तसेच भारतात क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करणाऱ्यांसाठी दंड आणि शिक्षेची तरतूद करण्यात यावी, असेही या प्रस्तावात म्हटले आहे. त्यामुळे बिटकॉईन आणि तत्सम क्रिप्टोकरन्सी बाळगून असणाऱ्या भारतातील अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
Govt of India: As for pvt cryptocurrencies, given the risks associated&volatility in their prices, Inter-Ministerial Committee has recommended banning of cryptocurrencies in India&imposing fines and penalties for carrying any activities connected with cryptocurrencies in India. pic.twitter.com/NcjkNoBXug
— ANI (@ANI) July 22, 2019
गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये बिटकॉईन संदर्भात बरीच चर्चा सुरु आहे. भारतामधील अनेक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित व्यक्तींनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केल्याचे वृत्त होते. त्यामुळे सरकार बिटकॉईनच्या व्यवहारांना अधिकृत मान्यता देणार का, याकडे सर्वांचे डोळे लागले होते. मात्र, केंद्रीय मंत्रिगटाच्या शिफारशीमुळे या अपेक्षांवर पाणी फेरले जाण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने यापूर्वीच क्रिप्टोकरन्सी व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगण्याच्या सूचना लोकांना दिल्या होत्या.
क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?
क्रिप्टोकरन्सी हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, तुम्ही आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरू शकता. आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात. या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे.
२००९ मध्ये सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने बिटकॉइनची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधील गणितीय आकडेमोड करून बिटकॉइन अस्तित्वास आले.